पुणे : पुण्यात खुनाच्या घटनांचे सत्र सुरूच आहे. कौटुंबिक वादातून सराइताने वहिनीच्या डोक्यात दगड घालून निर्घृण खून केल्याची घटना घडली आहे. एवढंच नाही तर तिचा मृतदेह पाचर्णे गावातील डोंगराजवळ नेऊन पुरला. धक्कादायक बाब म्हणजे मृतदेहाची विल्हेवाट लावून आरोपीने घरी येऊन मटण पार्टी केली. अखेर या गुन्ह्याचा उलगडा झाला. याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी एका सराइताला अटक केली आहे. गणेश रामभाऊ चव्हाण (वय २१, रा. परंदवाडी, शिरगाव, ता. वडगाव मावळ) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे.
गणेश चव्हाण याच्याविरुद्ध खून, दरोडा, जबरी चोरी, घरफोडी असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. पिंपरी-चिंचवड परिसरातील शिरगाव परंदवाडी येथे गणेश चव्हाण याने त्याची भावजय सुनंदा चव्हाण हिचा भाऊ लक्ष्मण चव्हाण याच्या मदतीने डोक्यात दगड घालून खून केला होता. त्यानंतर तिचा मृतदेह पाचर्णे गावाजवळ असलेल्या डोंगरात नेला. तेथे खड्डा खोदून मृतदेह पुरला.
थंड डोक्याने खून केल्यानंतर गणेश आणि त्याचा भाऊ लक्ष्मण घरी आले. त्यांनी घरी मटण तयार करून पार्टी केली. यानंतर गणेश चव्हाण पसार झाला. दरम्यान, पसार असलेला चव्हाण हा आरोपी गणेश नगर रस्त्यावरील लोणीकंद परिसरात येणार असल्याची माहिती पोलीस नाईक अजित फरांदे यांना मिळाली होती.
त्यावरून लोणीकंद परिसरातील जिल्हा परिषदेच्या शाळेजवळ पोलिसांनी सापळा रचून त्याला पकडले. पोलीस चौकशीत त्याने भावजयीचा खून केल्याचं कबुल केलं. त्यानंतर आरोपीला तपासासाठी परंदवाडी पोलीस चौकीतील उपनिरीक्षक तपासधिकारी सचिन सूर्यवंशी यांच्या ताब्यात दिलं. गणेशविरुद्द चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
या गुन्ह्यात त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (माेक्का) कारवाई करण्यात आली होती. तेव्हापासून तो पसार झाला होता. ही कारवाई लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे, सहायक निरीक्षक रवींद्र गोडसे, किरण पड्याळ, अजित फरांदे, प्रतिक्षा पानसरे यांनी केली.