सातारा : सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील अजनुज येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. अजनुज येथील पवार कुटुंबीय धोम-बलकवडी कालव्यावर कपडे, गोधड्या धुण्यासाठी गेले होते. त्यावेळी बाप-लेक दोघेही पाण्यात वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. शंभुराज विक्रम पवार (वय ५) आणि विक्रम मधुकर पवार (वय ३२) हे बापलेक कालव्यात वाहून गेले. या घटनेत शंभुराज याचा मृत्यू झाला, तर विक्रम हे बेपत्ता आहेत. खंडाळा-शिरवळ रेस्क्यू टिम आणि परिसरातील ग्रामस्थांनी शोध घेतला मात्र ते सापडले नाहीत.
पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, खंडाळा तालुक्यातील अजनुज येथील पवार कुटुंबीय पाच ते सहा नागरिक धोम-बलकवडी कालव्यावर कपडे, गोधडी धुण्यासाठी गेले होते. त्यावेळी ५ वर्षाचा शंभुराजही त्यांच्याबरोबर गेला होता. शंभूराज पाण्याजवळ उभा असताना अचानक त्याचा पाय घसरला आणि कालव्याच्या पाण्यात पडून वाहून जाऊ लागला. ही घटना लक्षात येताच त्याला वाचवण्यासाठी त्याचे वडील विक्रम यांनी पाण्यात उडी मारली. मात्र, त्यांना पोहता येत नसल्याने ते दोघेही पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले.
शंभुराज हा घटनास्थळापासून सुमारे दीड किलोमीटरवर पाण्यातून वाहताना दिसला. त्यावेळी बचाव कार्यासाठी आलेल्या रेस्क्यू टीमच्या तरुणांनी पाण्यात उड्या मारून त्याला बाहेर काढले. त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी शंभूराजला मृत घोषित केले. विक्रम पवार यांचा पोलीस, रेस्क्यू टिम आणि नागरिकांनी शोध घेतला. मात्र, संध्याकाळपर्यंत ते सापडले नव्हते. रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम सुरू होती.