राजू देवडे
लोणी धामणी : विद्यार्थ्यांना व्यवहारज्ञानाची माहिती होऊन बुद्धिमत्ता वाढावावी, तसेच गणित विषयाची आकडेवारी कळावी, या उद्देशाने निरगुडसर (ता. आंबेगाव) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ‘बाल आनंद मेळावा’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात सहभागी विद्यार्थ्यांनी विक्रीसाठी लावलेल्या विविध ६५ स्टॉलमधून सुमारे १ लाख रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती मुख्याध्यापिका संगिता शेटे यांनी दिली.
या वेळी विद्यार्थ्यांनी बटाटा, कांदे, मेथीची भाजी, कोथिंबीर, कोबी, फ्लॉवर, भोपळा, शेपू असा विविध प्रकारचा भाजीपाला विक्रीसाठी आणला होता. तर खाऊ गल्लीत भेळ, लाडू, जिलेबी, पाणी पुरी, मसाला डोसा, इडली, अप्पे, पाव भाजी, पुलाव, नाचणी सूप, चायनीज पदार्थ विक्रीसाठी आणले होते. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिकणारा विद्यार्थी हा ग्रामीण भागातील असून, बहुतांश मुले सर्वसामान्य कुटुंबातील आहेत. विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनातील अभ्यासक्रमाचा मानसिक ताण दूर करुन विरंगुळा मिळावा व त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळावा, या उद्देशाने दरवर्षी आनंद मेळाव्याचे आयोजन केले जाते, असे सहशिक्षक नारायण गोरे यांनी सांगितले.
या मेळाव्यासाठी मंदाताई वळसे पाटील, विघ्नहर कारखान्याचे संचालक नामदेव थोरात, सरपंच रवींद्र वळसे पाटील, उपसरपंच नीतीन टाव्हरे, उपसरपंच आनंदराव वळसे पाटील, पोलीस पाटील विठ्ठल वळसे पाटील, प्राचार्य कांताराम टाव्हरे, केंद्रप्रमुख कांताराम भोंडवे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रदीप खिलारी, उपाध्यक्ष बाबाजी मेंगडे, चेअरमन सुरेश टाव्हरे, रामदास थोरात, डॉ. शांताराम गावडे, प्रकाश वळसे पाटील, सुनंदा गोरे, जयश्री थोरात, पूजा थोरात, सारीका कडवे, शिल्पा राऊत या मान्यवर मंडळींनी तसेच पंडित नेहरू विद्यालयाचे विद्यार्थी, ग्रामस्थ व पालकांनी भेटी देऊन या उपक्रमाचे कौतुक केले.
हा मेळावा यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापिका संगिता शेटे, शिक्षक नारायण गोरे, सुभाष इंदोरे, वैशाली वळसे, प्रतिभा वाकचौरे, संगिता इंदोरे, मनिषा हिंगे यांनी प्रयत्न केले.