पुणे : आजपर्यंत तुम्ही अनेक वादळं पाहीली असतील. कधी वारा, पाऊस, तर कधी धूळ यांचा झंझावात असतो. पण मच्छरांचं वादळ पाहिलं आहे का? नाही ना. पण पुणेकरांना चक्क मच्छरांच्या वादळाचा अनुभव मिळालाय. यामुळे ते धास्तावले आहेत.
पुण्यात मच्छरांचं वादळ आल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत लाखो, करोडो मच्छर हवेत दिसत आहेत. अगदी आकाशापर्यंत त्यांच्या रांगा दिसत आहेत. मुठा नदीवर हे वादळ आल्याची माहिती आहे. तसेच हा व्हिडीओ केशवनगर आणि खर्डी परिसरातील असल्याची माहिती आहे.
टोलेजंग इमारतींवर मच्छरांचे भलेमोठे वादळ घोंगावताना व्हिडीओत दिसत आहे. आकाशात पक्षांप्रमाणे जणू काही डासांचे थवेच उडत आहेत असं या व्हिडीओत दिसत आहे. मध्य अमेरिका, रशिया अशा देशांमध्ये पावसाळ्यात हे मच्छरांचे वादळ पाहायला मिळते. पण भारतात असकाही झालं असेल अशी कुठेही वाच्यता नव्हती. सध्याचा ऋतू मच्छरांसाठी प्रजननकाळ आहे, असे काहींकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सर्वांची आरोग्यासंबंधी चिंता वाढली आहे. मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया असे आजार बळावण्याची भिती पुणेकरांना आहे.
Horrifying ‘mosquito tornado’ near Pune’s Keshav Nagar has sparked outrage, residents have demanded removal of hyacinths. Mosquito tornadoes like this have been reported from Central America and Russia usually during the rainy season.pic.twitter.com/n4SAwJlnzv
— Pune City Life (@PuneCityLife) February 10, 2024
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलं आहे की, नेमकं यामागे कारण काय आहे? त्यावर एकाने उत्तर दिलं की “नद्या स्वयं-स्वच्छता करत असतात. त्यामध्ये डासांच्या अळ्या खाणारे प्राणी असतात. महानगरपालिका नदीत सांडपाणी टाकते आणि प्रदूषित करते, यामुळे जलकुंभाची अनियंत्रित वाढ होते ज्यामुळे नदीचा पृष्ठभाग डासांच्या उत्पत्तीसाठी पुरेसा आहे. हे ऐकायला मजेशीर वाटू शकतं, पण आजार बळावू शकतात. तर दुसऱ्याने लिहिलय की, मॉस्किटो इलेक्ट्रिक रॅकेट हवेत फिरवण्याची गरज आहे.