युनूस तांबोळी
शिरुर : महिलांनीच प्रथम महिलांचा आदर केला पाहिजे. यासाठीच हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन केले आहे. महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी रोजगार निर्मिती होणे गरजेचे आहे. महिलांनी आपापसातील हेवेदावे सोडून महिलांच्या प्रगतीसाठी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे मत यशस्विनी ऊन्नती केंद्राच्या अध्यक्षा किरणताई वळसे पाटील यांनी व्यक्त केले.
टाकळी हाजी (ता. शिरूर) येथे हजारो महिलांच्या उपस्थितीत रंगलेल्या हळदी-कुंकू समारंभात सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्या पत्नी किरणताई वळसे पाटील यांनी महिलांशी संवाद साधत ‘खेळ पैठणी’चा कार्यक्रमात रंगत भरली.
या वेळी अनुसया महिला उन्नती केंद्राच्या वतीने टाकळी हाजी येथे बापूसाहेब गावडे विद्यालयात टाकळी हाजी-कवठे यमाई जिल्हा परिषदेतील गटातील महिलांसाठी हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे संयोजन जिल्हा परिषद सदस्य सुनीता गावडे व माजी नगराध्यक्ष मनिषा गावडे यांनी केले. हळदी-कुंकू कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रथमच या भागातील महिलांना सुनिता गावडे व मनिषा गावडे यांनी गावोगावी जाऊन निमंत्रण दिल्याने, मोठ्या प्रमाणात महिलांनी उपस्थिती लावत कार्यक्रमाला गर्दी केली होती. महिलांच्या गर्दीमुळे शाळेचे मैदान फुलले होते.
या वेळी महिलांसाठी ‘खेळ पैठणी’चा हा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात किरणताई वळसे पाटील यांच्यासह सुनीता गावडे मनिषा गावडे, गावच्या सरपंच, महिला पदाधिकारी यांनी सहभाग घेतला. या वेळी किरणताई वळसे म्हणाल्या की, महिलांनी चूल व मूल यापलिकडे जाऊन जीवनाचा आनंद घेतला पाहिजे. आज प्रत्येक क्षेत्रात महिलांनी कामाचा ठसा उमटविला आहे. पुरुषांच्या बरोबरीने त्या काम करीत आहेत. पालकांनी मुलींनाही उच्चशिक्षित करून स्वतःच्या पायावर उभे केले पाहिजे. विधवा महिलांनाही समाजाने मानसन्मान देण्याची गरज आहे.
जिल्हा परिषद सदस्या सुनिता गावडे यांनी उपस्थित महिलांचे स्वागत केले. या वेळी विधवा महिला तसेच महिला उद्योजिका यांचा सन्मान किरणताई वळसे यांच्या हस्ते करण्यात आला. ग्रामविकास संस्थेचे सचिव राजेंद्र गावडे यांनी किरणताई यांचा संस्थेच्या वतीने सन्मान केला. खेळ पैठणीचा कार्यक्रमाचे सुत्रसंचालन निलेश पडवळ यांनी केले. आभार संविदण्याच्या सरपंच शुंभागी पडवळ यांनी मानले.
या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात झालेली गर्दी ही तर सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील व माजी आमदार पोपटराव गावडे यांनी केलेल्या कामाची पावती असल्याची प्रतिक्रिया उपस्थित महिलांनी व्यक्त केली.