पिंपरी : पुण्यातील हिंजवडी परिसरात बनावट पासपोर्ट तयार करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. ब्रुनेई देशात जाण्यासाठी बनावट पासपोर्ट बनवणाऱ्या तिघांसह शिक्का बनवून देणाऱ्याला हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींनी १२५ लोकांकडून पासपोर्ट घेऊन ४८ बनावट पासपोर्ट बनविले असून त्यासाठी पैसे घेतल्याचे उघडकीस आले आहे.
विजय प्रताप सिंग (वय ४४), किसन देव पांडे (वय ३५, दोघे रा. मामुर्डी, मूळ – उत्तर प्रदेश), हेमंत सीताराम पाटील (वय ३८, रा. किवळे, मूळ – गवळेनगर, धुळे), किरण अर्जुन राऊत (वय ३४, रा. शाहूनगर, चिंचवड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत मनीष कन्हैयालाल स्वामी (वय ३२, रा. राजस्थान) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून, आरोपी विजय, किसन आणि हेमंत हे पूर्वी आयात-निर्यात व्यवसायात काम करत होते. त्यांनी लोकांच्या फसवणुकीची नवीन पद्धत शोधून काढली. भारतातून परदेशात जाणारे वेल्डर, वाहनचालक, प्लंबर यांना पासपोर्ट देण्यासाठी ‘ब्ल्यू ओसियन मरीन’ या नावाने कंपनी सुरू केली. लोकांकडून पासपोर्ट काढण्यासाठी पैसे घ्यायचे आणि पैसे घेऊन पळून जायचे. पासपोर्ट काढून देण्यासाठी लोकांकडून खरे पासपोर्ट घेतले जात होते.
विश्वास संपादन करण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी नागरिकांना सांगितले जात असे त्यानुसार, नागरिकांकडून कागदपत्रे आल्यानंतर पासपोर्टवर ब्रुनेई देशाचा बनावट शिक्का मारून त्यांना खरे पासपोर्ट असल्याचे भासवून दिले जायचे. काहीजण ब्रुनेई देशात जाण्यासाठी पासपोर्ट घेऊन विमानतळावर गेले असता तिथे हे शिक्के बनावट असल्याचे निदर्शनास आले. काही लोकांनी दिल्ली येथील ब्रुनेई देशाच्या दुतावासात जाऊन खातरजमा केली. त्यावेळी त्यांच्या पासपोर्ट बनावट शिक्के मारल्याची खात्री झाली.
या बसा शिक्के घेऊनच जा
चिखलीतील युनिक प्रिंटर्स अँड झेरॉक्स या दुकानातून आरोपींनी बनावट शिक्के तयार करून घेतले होते. पोलिसांनी दुकानदार किरण राऊत याला देखील अटक केली आहे. त्याने दुकानावर ‘या बसा शिक्के घेऊनच जा’ अशा प्रकारची जाहिरात केली होती. पैशांच्या लालसेपोटी किरण याने हे बनावट शिक्के तयार करून दिले असल्याचे पोलिसांना सांगितले आहे. त्याच्याकडून शिक्के बनविण्याची मशिन असा ६० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.