मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून गोळीबाराच्या एकामागे एक घटना घडल्या आहेत. ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर झालेल्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. या घटनेबाबत शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. तसेच, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लबोल केला.
देवेंद्र फडणवीसांची मानसिक स्थिती स्थिर नाही, राज्याला मनोरुग्ण गृहमंत्री लाभले आहेत, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी सडकून टीका केली आहे. तसेच, सरकार बरखास्त करा, ताबडतोब निवडणुका आणि राष्ट्रपती राजवट लागू करा, अशी मागणीही यावेळी उद्धव ठाकरे यांनी केली.
उद्धव ठाकरे म्हणाले की, डोळ्यांसमोर जी बेबंदशाही सुरू आहे, यामुळे महाराष्ट्रातील जनता दुखवली गेली आहे. सरकारमध्ये गँगवॉर सुरू आहे. गणपत गायकवाड यांचा सीसीटीव्ही न मागता समोर आला. मी काल पोलिसांशी बोलताना त्यांनी सांगितलं की, त्याच्याकडे परवाना धारक बंदूक नव्हती. आम्ही राज्यपालांकडे जाणार नाही.
गणपतीविसर्जनाच्या वेळी एका आमदाराने गोळीबार केला त्याला क्लिनचीट दिली. बोरीवली येथील आमदाराच्या मुलाने एकाचे अपहरण केलं त्यांच्यावर देखील काहीच झालं नाही. निखिल वागळे,असिम सरोदे यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. मात्र, याबाबत पोलिसांनी काहीच कारवाई केली नाही. देवेंद्र फडणवीस यांची मानसिक स्थिती स्थिर नाही, राज्याला मनोरुग्ण गृहमंत्री लाभले आहेत, निर्ढावलेला निर्दय मनाचा हा गृहमंत्री आहे, एखाद्या वक्तीचा मृत्यू होतो आणि तुम्ही त्यांची तुलना श्वानाशी करता? असं म्हणत ठाकरेंनी फडणवीसांवर टिकास्त्र सोडलं आहे.