लोणी काळभोर: आपला दस्त सर्वात पहिला नोंदवावा यासाठी लोणी काळभोर (ता. हवेली) येथील दुय्यम निबंधक कार्यालय हवेली क्र.६ मध्ये शुक्रवारी (ता.९) पाच वाजण्याच्या सुमारास तब्बल एक तास गोंधळ झाला. यावेळी पक्षकाराने वकिलाच्या मदतनीसास मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे सरकारी कार्यालये सुरक्षित आहेत की नाही, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर येथील हवेली दुय्यम निबंधक कार्यालय क्र ६ च्या शासकीय माहिती अधिकारी तथा सह दुय्यम निबंधक अधिकारी नीता शिराळ या मागील काही दिवसांपासून रजेवर गेल्या आहेत. त्यांच्या जागेवर मागील दोन दिवसांपासून प्रभारी म्हणून संतोष वीरकर कार्यरत आहेत.
शुक्रवारी (ता.९) पाच वाजण्याच्या सुमारास पक्षकार व वकिलाचे मदतनीस विजय कुंभार यांचा दस्त नंबरहून वाद झाला. यावेळी पक्षकाराने विजय कुंभार यांना कार्यालयाच्या बाहेर आल्यानंतर मारण्याची धमकी दिली. तसेच हा गोंधळ दुय्यम निबंधक कार्यालयात तब्बल एक तास सुरु होता. त्यामुळे सदर ठिकाणी प्रचंड गोंधळ उडाल्याने दस्त खरेदीसाठी आलेल्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.
दरम्यान, दस्त नोंदणीसाठी कार्यालयात आलेले शिक्षक राजेश काळभोर व ॲड. अमित काळभोर यांनी मध्यस्थी करून भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला. परंतु, कार्यालयीन प्रभारी अधिकारी असलेले संतोष वीरकर यांनी हाताची घडी तोंडावर बोट ठेवून शांतपणे बघ्याची भूमिका घेतली. शासकीय कार्यालयात अडथळा आणून शांततेचा भंग केल्याप्रकरणी प्रभारी अधिकारी संतोष वीरकर यांनी पोलीस ठाण्यात तक्रार देणे आवश्यक होते. नागरिकांच्या हितासाठी त्यांनी भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला नाही. मात्र, उलट त्यांनी मुग गिळून गप्प बसण्याचे धोरण स्वीकारल्याने तेथे आलेल्या नागरिकांनी त्यांच्यावर नाराजी व्यक्त केली.
प्रभारी अधिकाऱ्यासह पक्षकारावर कारवाई व्हावी
दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणीच्या नंबरवरून वाद झाला होता. यावेळी पक्षकाराने विजय कुंभार यांना मारण्याची धमकी दिली. तसेच शासकीय कार्यालयात तब्बल एक तास गोंधळ झाला. याचा तेथील आलेल्या नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. मात्र, प्रभारी अधिकारी संतोष वीरकर यांनी कोणताही निर्णय घेतला नाही. भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला नाही किंवा याची खबर पोलिसांनी दिली नाही. त्यामुळे प्रभारी अधिकाऱ्यासह पक्षकारावर कडक कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
दुय्यम निबंधक कार्यालयात वकिलांच्या नातेवाईकांची लुडबुड
लोणी काळभोर येथील दुय्यम निबंधक कार्यालयात वकिलाचे नातेवाईक लुडबुड करीत आहेत. त्यामुळे शासकीय कामात अडथळा येत आहे. वकिलाचे नातेवाईक माझा नंबर पहिला यावा म्हणून नेहमी लुडबुड करताना आढळून येत आहेत. वकील घरी आणि नातेवाईक कार्यालयात लुडबुड करून दस्त नोंदणी करीत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे दुय्यम निबंधक कार्यालयात वकिलांच्या नातेवाईकांनी लुडबुड कायमची बंद करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी पाऊले उचलण्याची गरज आहे.
रस्त्यावर गाड्या लावल्याने वाहतूक कोंडी
कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील संभाजीनगरमध्ये दुय्यम निबंधक कार्यालय हवेली क्र.६ आहे. या कार्यालयात खरेदी विक्री सह इतर व्यवहार होत असतात. त्यामुळे या कार्यालयात दररोज शेकडो नागरिक येतात. मात्र, या कार्यालयात कामानिमित्त आलेले नागरिक रस्त्यावरच गाड्या पार्क करीत असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. त्यामुळे या रस्त्यावर पार्क केलेल्या गाड्यांवर पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
नागरिक खरेदी विक्रीचा व्यवहार करण्यासाठी खूप दूरवरून आलेले असतात. त्यांना तासनतास कार्यालयात उपाशी व ताटकळत बसावे लागत असते. त्यातच या भांडणामुळे आपले काम होते का नाही, अशी चिंता नागरिकांमध्ये दिसून येत होती.
शासकीय कार्यालयात गोंधळ घालणे अत्यंत चुकीचे आहे. यासाठी सोमवारी सर्व सहाय्यक दुय्यम निबंधक अधिकाऱ्यांना बोलाविणार आहे व या प्रकरणाची माहिती घेणार आहे. तसेच यापुढे शासकीय कार्यालयात अशा घटना होणार नाहीत, याची काळजी घेणार आहे.
संतोष हिंगाणे (सहाय्यक जिल्हा निबंधक, पुणे)