सोलापूर : मंगळवेढ्यात पोलीस उपिरीक्षक अंकुश वाघमोडे यांच्यावर ढाबा चालकाने हल्ला केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे पोलीसच सुरक्षित आहेत का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून कडक कारवाईची मागणी केली जात आहे. मंगळवेढा तालुक्यातील मरवढे येथे रात्री उशिरापर्यंत एक ढाबा सुरू होता. त्या ढाब्यावर कारवाई करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक अंकुश वाघमोडे गेले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत गाडी चालक होता. त्या दोघांवर ढाबा चालकासह सात ते आठ जणांनी लाठ्या काठ्यांनी हल्ला केला.
या घटनेत पोलीस उपनिरीक्षक अंकुश वाघमोडे हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर मंगळवेढा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अंकुश वाघमोडे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. तर ड्रायव्हर किरकोळ जखमी झाला आहे. या प्रकरणी मंगळवेढा पोलीस ठाण्यात ढाबा चालकासह इतर संशयितांवर गुन्हा दाखल झाला आहे. ढाबा मालकाचे नाव समीर मुजावर असे आहे. तर चालकाचं नाव अंसारी असे आहे.
नेमक काय घडलं?
मरवढे येथील महाराजा ढाबा रात्री उशिरापर्यंत सुरू होता. ढाबा उशिरापर्यंत का सुरू ठेवला? बंद करा असे सांगताच, ढाबा चालकासह इतर सात ते आठ अनोळखी तरूणांनी पोलीस उपनिरीक्षक अंकुश वाघमोडे आणि त्यांच्या ड्रायव्हरला मारहाण केली. आरोपींनी पोलीस उपनिरीक्षक आणि त्यांच्या गाडी चालकाला लाकडी दांडके, काठ्यांनी डोक्यात आणि हाता पायावर मारून गंभीर जखमी केले आहे.