पुणे : पुणे पोलिसांनी बुधवारी (दि. ७ फेब्रुवारी) रोजी सगळ्या गुन्हेगारांची परेड काढून सोशल मीडियावर गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणारे रिल्स यापुढे टाकू नये असे आदेश दिले होते. मात्र पुणे पोलिसांच्या आदेशाला गुंडांनी डावलल्याचे पाहायला मिळाले. सोशल मीडिया इंस्टाग्रामवर गुंड निलेश घायवळ याचे दहशत पसरवणारे रिल्स अपलोड झाल्याचे समोर आले आहे.
गुन्हेगारीला खतपाणी घालणारे रिल्स-व्हिडीओ गुंडांनी, गुंडांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर पोस्ट करायचे नाहीत, अशी सक्त ताकीद पुण्याचे नवे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सगळ्या गुन्हेगारांना दिली होती. त्यासोबत उपायुक्तांनी देखील गुन्हेगारांना तंबी दिली. पुणे पोलिसांनी हे जाहीरपणे सांगून काही तास उलटायच्या आतच हा प्रकार समोर आला आहे.
निलेश घायवळ हा गजा मारणेच्या टोळीत गुंड म्हणून काम करायचा. पुण्यातील कोथरुड परिसरातील सुतारवाडीत निलेश घायवळची दहशत होती. मात्र गजा मारणेशी बिनसल्यावर मारणे गॅंगने घायवळवर दोनदा हल्ले केले. त्याचं प्रत्युत्तर घायवळ टोळीने दिलं. अखेर दत्तवाडीत गुंड सचिन कुडलेची निलेश घायवळ आणि साथीदारांनी रस्त्यात पाठलाग करुन फिल्मी स्टाईलने हत्या केली.कुडलेच्या हत्येनंतर घायवळसह 26 जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई झाली.
2019 मध्ये निलेश घायवळ तुरुंगातून सुटला. बाकी गुन्ह्यातदेखील घायवळला जामीन मिळाला आणि 2023 मध्ये तो अखेर तुरुंगातून बाहेर आला. घायवळवर पुण्यात हत्या, हत्येचा प्रयत्न, बेकायदा शस्त्र बाळगणे मारामारी करणे, परिसरात दहशत पसरवणे यासारख्या गुन्ह्यांची नोंद आहे.
सध्या निलेश घायवळ हा त्याचे मूळ गाव असलेल्या जामखेड तालुक्यात राजकारणात सक्रिय होण्याच्या प्रयत्नात आहे. त्यातून तो आमदार संतोष बांगर यांच्या संपर्कात आला आणि त्याच्या मार्फत थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचला. या मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर अनेक विरोधीपक्षातील नेत्यांकडून मुख्यमंत्र्यांवर टीका करण्यात आली.