पुणे : प्रगत संगणन विकास संस्थेने (सी-डॅक) देशातील पहिला महासंगणक ‘परम ८०००’ हा १९९१ मध्ये कार्यान्वित केला. त्यानंतर ‘परम’ महासंगणक उत्तरोत्तर अधिक विकसित करण्यात आला. आता याच क्षेत्रात ‘सी-डॅक’ने एक पाऊल पुढे टाकले आहे. सध्याच्या महासंगणकापेक्षा अधिक वेगवान ‘परमशंख’ या महासंगणकाची निर्मिती ‘सी-डॅक’ करत आहे. विशेष म्हणजे पुण्यासह बंगळुरू, हैदराबाद आणि त्रिवेंद्रम येथील तीनशे शास्त्रज्ञ या महासंगणकाच्या निर्मिती प्रक्रियेत सहभागी झाले आहेत. भारतीय बनावटीचा हा महासंगणक २०२८ पर्यंत कार्यान्वित होण्याची शक्यता आहे.
‘सी-डॅक’चे कार्यकारी संचालक कर्नल (निवृत्त) ए. के. नाथ यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. महासंगणकाच्या संशोधनाला चालना देण्यासाठी ‘राष्ट्रीय महासंगणक मोहीम’ केंद्र सरकारने राबवली. बंगळुरू येथे वीस पेटा प्लॉफ या क्षमतेचा महासंगणक पुढील काही आठवड्यांत कार्यान्वित करण्यात येणार आहे. मात्र, संशोधनासाठी अधिक क्षमतेच्या महासंगणकाची गरज निर्माण होत असल्याने सध्याच्या क्षमतेपेक्षा अधिक क्षमतेचा (एक्सास्केल) महासंगणक तयार करण्याचे काम सुरू झाले आहे.
‘परमशंख’ या महासंगणकाची प्रचंड क्षमता आहे. याची गती हजार पटीने मोठी असून, त्या आधारे संशोधकांना ‘डेटा’चे विश्लेषण अतिवेगाने करणे सुलभ होणार आहे. या महासंगणकामुळे भारत संशोधनाच्या क्षेत्रात मोठी झेप घेऊ शकतो, हे स्पष्ट होत आहे.
सध्या अमेरिका, जपान, युरोपमध्ये प्रचंड क्षमता असलेले महासंगणक कार्यान्वित आहेत. भारतातही आता ‘एक्झास्केल’ महासंगणकाची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे परमशंख हा अधिक वेगवान महासंगणक तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ‘मेक इन इंडिया’ मोहिमेंतर्गत भारतीय बनावटीचे ‘प्रोसेसर’ आणि ‘स्टोरेज’सह स्वदेशी सुटे भाग वापरण्यात येणार आहेत. भारतासाठी ही मोठी क्रांती असणार आहे.