पुणे : सर्वाधिक वाहतूक कोंडी असणाऱ्या जगातील ‘टॉप टेन’ शहरांची नावे जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये पहिल्या दहा शहरांमध्ये पुणे आणि बंगळुरूचा समावेश असून, पुणे शहर सातव्या तर बंगळुरु सहाव्या क्रमांकावर असल्याचे समोर आले आहे.
‘टॉमटॉम’ या आंतरराष्ट्रीय संस्थेने याबाबतचा अहवाल जारी केला आहे. यामध्ये जागतिक पातळीवर लंडन हे जगातील सर्वाधिक वाहतूक कोंडी असणारे प्रथम क्रमांकाचे शहर ठरले आहे. तेथे गर्दीच्या वेळी वाहतुकीचा सरासरी वेग 14 किमी प्रतितास वेग नोंदवला आहे. अरुंद रस्ते आणि वाढती वाहन संख्या हे मुद्दे सर्वत्र समान असल्याचेही या अहवालात सांगण्यात आले. गर्दीच्या वेळी म्हणजे सकाळी आणि सायंकाळी या कोंडीत भर पडते. त्यामुळे वाहनांचा वेग मंदावतो आणि कोंडी वाढत जाते.
वाहतूक कोंडीच्या जागतिक क्रमवारीत लंडन पहिल्या, डब्लिन दुसऱ्या, टोरोंटो तिसऱ्या, मिलान चौथ्या, लिमा पाचव्या, बंगळुरू सहाव्या तर पुणे सातव्या क्रमांकावर आहे. याशिवाय, राजधानी दिल्ली 44 तर मुंबई 54 व्या स्थानावर आहे.