पुणे : पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. घरच्यांना शूट करण्याची धमकी देत एका तरुणाने लग्नाचे आमिष दाखवून मुलगी अल्पवयीन असल्यापासून तब्बल चार वर्ष तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी एका २४ वर्षीय तरुणावर बलात्कार आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
हा प्रकार ऑक्टोबर २०१९ ते नोव्हेंबर २०२३ या कालावधीत पीडित मुलीच्या घरी, बिबवेवाडी, गोकुळनगर आणि कात्रज या ठिकाणी घडला आहे. याबाबत धनकवडी येथे राहणाऱ्या १९ वर्षीय मुलीने ४ फेब्रुवारीला भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून प्रकाश हंसाराम चौधरी (२४, रा. खराडी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, पीडित मुलगी ही पंधरा वर्षांची असल्यापासून आरोपी प्रकाश चौधरी याला ओळखते. आरोपी चौधरी याला पीडित मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असताना देखील तिच्या घरी जाऊन तिला धमकी देत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. तसेच याबाबत कोणाला काही सांगितले तर ‘मी तुला आणि तुझ्या घरच्यांना शूट करुन टाकीन’ अशी धमकी देऊन तिच्यासोबत सतत गैरवर्तन केले.
आरोपीने मुलीला वेळोवेळी बोलवून घेत तिला बिबवेवाडी, कात्रज परिसरातील लॉजवर नेऊन लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवले. आरोपीने लग्नास नकार दिल्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच मुलीने पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी आरोपीवर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक निकम करत आहेत.