पुणे : विश्रांतवाडी परिसरात पोलिसांच्या मोटारीची ज्येष्ठ नागरिकाला धडक बसली. या धडकेत सायकलस्वार ज्येष्ठ नागरिक गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी विश्रांतवाडी पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, गजानन रत्नाकर शिंदे (वय ७७, रा. श्रीराम अपार्टमेंट, पोरवाल पार्क, शांतीनगर, येरवडा) असे गंभीर जखमी झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. या प्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विश्रांतवाडी परिसरातील मनोरुग्णालय भागातून सायकलस्वार शिंदे निघाले होते. त्यावेळी पोलिसांची मोटार त्याच मार्गावरून भरधाव वेगाने निघाली होती. सायकलस्वार शिंदे यांना मोटारीने धडक दिल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली. शिंदे यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सुधा चौधरी करत आहेत.