दौंड: दौंड तालुक्यातील मंडल अधिकाऱ्याच्या ‘येडा गबाळा’ कारभाराला तहसीलदारांनी ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. वरिष्ठांच्या आदेशाला न जुमानता कारभार करणाऱ्या मंडल अधिकाऱ्याची कानाने बहिरा अन् डोळ्याने आंधळा’ या शीर्षकाखाली “पुणे प्राईम न्यूज” ने बातमी प्रकाशित केली होती. त्यानंतर तहसीलदार अरुण शेलार यांनी मंडल अधिकारी भानुदास येडे यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावल्याने पुढील कारवाईकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
मंडल अधिकारी भानुदास येडे यांच्या अर्धन्यायीक न्यायाधीकरणाच्या कार्यप्रणालीवर तक्रारदाराने तक्रार केलेली आहे. मौजे नानवीज, तालुका दौंड, जिल्हा पुणे येथील गट नंबर २१३/१ वरील फेरफार नोंद क्रमांक २६७६ बाबत तक्रार केस दाखल होती. मंडल अधिकारी स्तरावर तक्रार केसमधील जाब देणार स्थानिक असल्याने व त्यांचा त्या प्रक्रियेत दबाव असल्याने प्रस्तुतची तक्रार केस तहसील कार्यालयात वर्ग करण्यासाठी दाद मागितली होती.
त्यामुळे संबंधित केस नायब तहसीलदार यांच्याकडे वर्ग करण्यासंदर्भात तहसीलदारांनी लेखी आदेश दिलेला होता. मात्र, या आदेशाला न जुमानता मंडल अधिकारी येडे यांनी सुनावणी घेत निर्णय पारित केलेला आहे. वरिष्ठ कार्यालयातील लेखी आदेशाकडे दुर्लक्ष केल्यास, तसेच कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी कारवाई होऊ शकते, हे सर्व ज्ञात आहे. मात्र, तरीदेखील प्रोटोकॉलच्या पाठबळावर तहसीलदार यांच्या आदेशाला हरताळ फासण्याचे काम मंडल अधिकाऱ्याने केले आहे. परंतु, या अनागोंदी प्रकाराला ‘पुणे प्राईम न्यूज’ने वाचा फोडली आहे.
तहसीलदारांनी प्रस्तुतची केस तहसील कार्यालयात वर्ग करण्यात यावी, यासाठी लेखी आदेश दिलेला होता. तरीही सर्कलच्या मनमानी कारभारामुळे तक्रार केस वर्ग झाली नाही. दौंड मंडल अधिकारी भानुदास येडे यांच्या तक्रारी केसेसच्या कामकाजातील अनियमिततेची तक्रार विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्याकडे केली आहे.
– रमेश भोसले शेतकरी
याबाबत बोलताना दौंडचे तहसीलदार अरुण शेलार यांनी सांगितले की, शेतकरी रमेश भोसले यांच्या तक्रारीवरून दौंडचे मंडलाधिकारी भानुदास येडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. याबाबत संबंधित मंडलाधिकारी यांच्याकडून खुलासा किंवा अहवाल प्राप्त झाला आहे किंवा नाही याबाबत सोमवारी (ता. ५ जानेवारी) माहिती देण्यात येईल.