पुणे : पुण्यातील चंदननगर परिसरातील खराडी येथून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका २२ वर्षीय विवाहित गरोदर महिलेने सासरच्या जाचाला कंटाळून राहत्या घरी पंख्याला गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी पतीसह तिघांवर गुन्हा दाखल केला असून सासऱ्याला अटक केली आहे.
सासरच्या मंडळींनी मे २०२३ पासून आजपर्यंत राघोबा पाटीलनगर, खराडी येथे गरोदर महिलेला मानसिक त्रास दिला या त्रासाला कंटाळून महिलेने टोकाचं पाऊल उचललं. प्रणिता आकाश गायकवाड (वय-22) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.
याबाबत मयत प्रणिताचे काका नचिकेत शिवाजी भोसले (वय-४० रा. किंगस्टन एलिशिया सोसायटी, पिसोळी) यांनी गुरुवारी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन पती आकाश गायकवाड (वय-२६), सासु लक्ष्मीबाई गायकवाड (वय-४५), सासरे अंकुश गायकवाड (वय-५०) यांच्यावर आयपीसी ३०४ ब नुसार गुन्हा दाखल करुन अंकुश गायकवाड यांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, फिर्यादी यांची पुतणी प्रणिता हिचा विवाह थाटामाटात पारंपरिक पध्दतीने आकाश याच्यासोबत २१ मे २०२ रोजी झाला होता. लग्नानंतर दोन महिन्यांनी प्रणिताचा पती आणि इतर आरोपींनी संगनमत करुन छोट्या कारणावरुन प्रणिताला त्रास देण्यास सुरुवात केली.
तुला स्वयंपाक नीट येत नाही, लग्न मोठे करुन दिले नाही, लग्नात मानपान केला असे बोलून मानसिक त्रास दिला. तसेच ती गरोदर असताना डोहाळ जेवण मोठे करुन द्या अशी मागणी आरोपींनी केली. मात्र, माहेरची परिस्थिती गरीब असल्याने त्या गोष्टीचे प्रणिताने टेन्शन घेतले. यातूनच तिने राहत्या घरात पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास चंदननगर पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक हंबीर करीत आहेत.