पुणे : पुण्यातील हडपसर परिसरातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. जेवण बनवले नाही म्हणून पतीने पत्नीवर कांदा कापण्याच्या चाकून वार करुन जखमी केल्याचा प्रकार घडला आहे. हा प्रकार हडपसर परिसरात झेड कॉर्नर मांजरी बुद्रुक येथे १ फेब्रुवारीला रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडला आहे. याप्रकरणी नमिता श्रावण माने (वय-33 रा. जी एत कॉम्प्लेक्स, झेड कॉर्नर, मांजरी बुद्रुक) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून पोलिसांनी आरोपी पतीवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, नमिता आणि तिचा पती या दोघांचा घरगुती कारणावरुन वाद सुरु होता. तसेच जेवण बनवले नाही यावरून यांच्यात वाद सुरु असताना आरोपी पतीनं घरातील कांदा कापण्याच्या चाकू घेऊन पत्नी नमिता हिच्या हातावर सपासप वार केले. तसेच तिला जबर मारहाण करुन जखमी केले. याबाबत हडपसर पोलिसांनी आरोपी पतीवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास हडपसर पोलीस करत आहेत.