पुणे : महाराष्ट्राच्या राजकारणात बारामतीचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. बारामती म्हणजे पवार कुटुंबियाचा गड आहे. पवार कुटुंबामधून प्रथम शरद पवार राजकारणात आले. त्यानंतर अजित पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार, पार्थ पवार अशी एक फळी तयार झाली. आता पवार कुटुंबातील आणखी एक चेहरा राजकारणात येत आहे. अजित पवार यांचे कनिष्ठ पुत्र जय पवार राजकारणात येत असल्याची माहिती मिळत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंडखोरी केल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार वेगळे झाले. परंतु दोन्ही नेते एकमेकांविरोधात राजकीय मैदानावर ठाण मांडून आहेत. अजित पवार यांनी सध्या राज्यभरात पक्ष वाढीसाठी प्रयत्न सुरु केले आहेत. यामुळे बारामतीच्या राजकारणात लक्ष घालण्यासाठी जय पवार सक्रीय होत असल्याची माहिती मिळत आहे. जय पवार यांना राजकारणात येण्यासाठी ग्रीन सिग्नल मिळाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
दरम्यान, अजित पवार यांचा मोठा मुलगा पार्थ पवार आधीच राजकारणात सक्रीय आहे. पार्थ पवार यांनी मावळ लोकसभा मतदार संघातून लोकसभा निवडणूक लढवली होती. परंतु त्यांना पराभवास सामोरे जावे लागले. आता अजित पवार यांचा दुसरा मुलगा जय पवार राजकारणात पाऊल ठेवत आहे. त्यांना बारामतीच्या राजकारणात लक्ष घालण्यासाठी अजित पवारांकडून ग्रीन सिग्नल मिळाल्याचे सूत्रांनी सांगितले.
बारामतीच्या राजकारणात जय पवार लक्ष देत आहेत. गुरुवारी एका दिवसात बारामतीत ११ राष्ट्रवादी युवा शाखांचे उद्घाटन त्यांनी केले. गुरुवारी केलेल्या दौऱ्याच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकीसाठी पक्ष संघटन मजबूत करायला जय पवार यांनीही सुरुवात केली आहे. यामुळे शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार यांच्याशी सामना करण्यासाठी अजित पवार यांना आणखी एक गडी मिळाला आहे.