पुणे : पुण्यात एका तरुणाची तब्बल ३० लाख रुपयांची फसवणूक झाल्याची घटना घडली आहे. मुळचा तो झारखंडचा. पुण्यात गेल्या काही वर्षांपासून तो आय टी कंपनीत नोकरी करत होता. परंतु काही कारणाने त्याचा जॉब गेला. घरी बसून नोकरीच्या शोधात असताना त्याला मोबाईलवर पार्ट टाईम जॉबचा मेसेज आला, अन् आजवर केलेली ३० लाखांची कमाई गमावून बसला. याबाबत वाकड येथे राहणार्या एका ३९ वर्षाच्या तरुणाने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, फिर्यादी हे मुळचे झारखंडमधील रहिवाशी आहेत. सध्या ते आई, पत्नी, मुलासह पुण्यातील कस्पटे वस्ती येथे राहतात. ते आय टी कंपनीत मोठ्या पदावर काम करत होते. मात्र, सध्या ते कोठेही काम करत नव्हते. २४ जानेवारी रोजी त्यांच्या मोबाईलवर पार्ट टाईम जॉब करण्याबाबतची ऑफर देण्यात आली होती. त्यांना संपर्क केल्यावर त्यांना तुम्हाला टेलिग्राम अप्लिकेशन घ्यावे लागेल, असं सांगण्यात आले. त्यांनी अप्लिकेशन घेतल्यावर त्यांना व्ही आय पी(VIP) टास्क ग्रुपमध्ये सामील केले. त्यांना ग्रुपवरील लिंकवर क्लिक करुन एका लिंक पेजवर रेटिग्ज देण्यास सांगण्यात आले. त्यानंतर त्यांना आम्ही तुम्हाला काही युपीआय(UPI) नंबर आणि अकाऊंट नंबर देतो, तुम्ही त्यावर आम्ही सांगेल, त्याप्रमाणे पैसे पाठवा.
तुमचे टास्क पूर्ण झाल्यावर तुम्हाला ४० लाख रुपये तुमचे खात्यावर जमा होतील, असं सांगण्यात आलं. त्यानंतर त्यांना पैसे ट्रान्सफर करण्यासाठी काही बँक खात्यांचे नंबर देण्यात आले. त्यावर विश्वास ठेवून त्यांनी २४ जानेवारी ते ३० जानेवारी २०२४ दरम्यान त्यांनी दिलेल्या अकाऊंटवर ३० लाख २० हजार ३७० रुपये पाठविले. त्यानंतर त्यांनी फिर्यादी यांना सांगितले की, तुमचा लॉस झाला असून तुम्ही आणखी पैसे भरा.
फिर्यादी यांनी आज पर्यंत केलेल्या नोकरीतून ३० लाख रुपये बचत केली होती. ती त्यांनी दिलेल्या अकाऊंटवर भरली होती. त्यांच्याकडील सर्व पैसे आता संपले होते. त्यांनी माझ्याकडे आता पैसे नाहीत, माझे पैसे मला परत करा़ असं सांगितलं. मात्र, त्यांनी पैसे परत करण्यास नकार दिला. यामुळे आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली असून पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंखे अधिक तपास करत आहेत.