पुणे : मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील सर्वेक्षणाची वाढवून दिलेली मुदत २ फेब्रुवारीला (आज) संपत आहे. मात्र, राज्यातील बहुतांश भागात सर्वेक्षणाचे काम प्रलबित आहे. तरीदेखील सर्वेक्षणाला मुदतवाढ मिळणार नसल्याचे महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाने स्पष्ट केले आहे. त्यानुसार २ फेब्रुवारीला रात्री १२ वाजता सर्वेक्षणाची संगणकप्रणाली बंद करण्यात येणार आहे.
सामान्य प्रशासन विभागाच्या सचिवांनी राज्यभरातील विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त यांची दूरदृश्यप्रणालीद्वारे गुरुवारी बैठक घेतली. या बैठकीत सर्वेक्षणाचा आढावा घेण्यात आला. त्यामध्ये राज्यातील ग्रामीण भागात सर्वेक्षण सरासरी ७० टक्के एवढे झाले आहे. मात्र, शहरी भागात सर्वेक्षण कमी झाले आहे.
याच पार्शवभूमीवर महापालिका आयुक्तांनी सर्वेक्षणाला मुदतवाढ देण्याची मागणी केली होते. शनिवार-रविवार सुटीच्या दिवशी कर्मचाऱ्यांना कामाला लावून सर्वेक्षण पूर्ण करता येईल, असं बैठकीत सांगण्यात आलं होतं. त्यानुसार राज्य शासनाच्या वतीने मागासवर्ग आयोगाला मुदतवाढ देण्याची विनंती केली होती. मात्र, ही विनंती आयोगाकडून फेटाळण्यात आली आहे.
राज्यातील जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांना पत्र
राज्य मागासवर्ग आयोगाच्या सचिव आ. उ. पाटील यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त यांना पत्र दिले आहे. यामध्ये आयोगाने २ फेब्रुवारी २०२४ पर्यंत सर्वेक्षण पूर्ण करणे आवश्यक आहे. सर्वेक्षणासाठी मुदतवाढ देण्यात येणार नाही, तरी मुदतवाढीची मागणी करू नये. २ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजून ५९ मिनिटांनी सर्वेक्षणाची संगणक प्रणाली बंद करण्यात येणार आहे.
त्यामुळे त्यापूर्वी सर्वेक्षणाचे काम पूर्ण करण्याबाबत प्रगणकांना सूचना द्याव्या. तसेच ३ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजेपर्यंत सर्वेक्षण पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र आयोगाकडे सादर करण्यात यावे, असे नमूद केले आहे. या पत्राची प्रत मुख्य सचिव, मुख्यमंत्री यांचे खासगी सचिव, सामान्य प्रशासन विभागाचे सचिव, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सचिव आणि सर्व विभागीय आयुक्त यांनाही पाठविण्यात आली आहे.