शिरुर, (पुणे) : शिरूर शहरातील मुख्य सराफ बाजारपेठेतील सराफ व्यावसायिकास अग्निशस्त्राचा वापर करून लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या तडीपार टोळीच्या म्होरक्याला स्थानिक गुन्हे अन्वेषण (ग्रामीण) पोलिसांनी अटक केली आहे.
शरद बन्सी मल्लाव (वय २४, रा. काची आळी, शिरूर ता. शिरूर) असे अटक करण्यात आलेल्या टोळीच्या म्होरक्याचे नाव आहे. तर त्याचा साथीदार सागर ऊर्फ बबलू दत्तात्रय सोनलकर (वय २३, रा. धायरी, पुणे) हा जखमी असून, त्याच्यावर ससून हॉस्पिटल येथे उपचार सुरु असून, त्यालाही अटक करण्यात येणार आहे. पोलिसांनी त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी, 3 गावठी पिस्टल व 2 काडतूस असा 1 लाख 25 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (ता. २८) शिरूर शहरात मुख्य सराफ बाजारपेठेत सुभाष चौकातील जगन्नाथ कोलथे सराफ दुकानाचे मालक अशोक कोलथे व त्यांचा कामगार भिका पंडीत हे संध्याकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास दुकान बंद करत असताना दुचाकीवरून आलेल्या अनोळखी दोन इसमांनी अग्निशस्त्राचा वापर करून सराफ दुकानातील सोने लुटण्याचा प्रयत्न केला.
भिका पंडीत यांनी विरोध केल्याने अनोळखी इसमांनी त्यांच्याकडील पिस्टलमधून भिका पंडीत यांच्या डोक्यात पिस्टलचा बट मारला व त्यांच्यावर पिस्टलमधून गोळी झाडली. याबाबत भीका एकनाथ पंडीत (वय ५०, रा. शिरूर ता. शिरूर) यांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार, अज्ञात दोघांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या घटनेचा तपास तात्काळ करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी ग्रामीण पोलिसांना दिल्या होत्या. तपास पथक गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करत असताना एका खबऱ्याने माहिती दिली की, सदरचा गुन्हा हा गुन्हेगार शरद मल्लाव व त्याचा साथीदार सागर ऊर्फ बबलु सोनलकर यांनी केला आहे. आरोपी हे सिंहगड किल्ल्याचे जंगलात लपून बसले आहेत.
मुख्य आरोपी शरद मल्लाव ताब्यात
मिळालेली माहिती वरिष्ठांना कळवून त्यांनी दिलेल्या आदेशानुसार, तपास पथकाने सिंहगड किल्ला परिसरातील जंगलातून गुन्ह्यातील मुख्य आरोपी शरद मल्लाव याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून तीन गावठी पिस्टल, दोन जिवंत काडतूस व गुन्हयात वापरलेली मोटार सायकल असा 1 लाख 25 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच त्याचा साथीदार सागर सोनलकर हा जखमी असून, तो ससून हॉस्पिटल येथे उपचार घेत असल्याने त्यास अटक करण्यात येणार आहे.
दोघेही रेकॉर्डवरील आरोपी
दरम्यान, सदरचे दोन्ही आरोपी हे रेकॉर्डवरील असून, आरोपी शरद मल्लाव याच्यावर शरीराविरुद्धचे व बेकायदेशीर अग्निशस्त्र बाळगण्याबाबतचे एकूण ७ गुन्हे दाखल आहेत. त्याला पुणे ग्रामीण जिल्हा व अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर व श्रीगोंदा तालुक्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आलेले आहे. तसेच आरोपी सागर ऊर्फ बबलु सोनलकर याचेवर शरीराविरूद्धचे २ गुन्हे दाखल आहेत. आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे व पोलीस उपनिरीक्षक एकनाथ पाटील हे करत आहेत.
ही कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पोलीस उपनिरीक्षक गणेश जगदाळे, प्रदीप चौधरी, अमित सिदपाटील, पोलीस अंमलदार तुषार पंदारे, जनार्दन शेळके, राजू मोमीण, सचिन घाडगे, अतुल डेरे, मंगेश थिगळे, योगेश नागरगोजे, दिपक साबळे, अजित भुजबळ, अक्षय नवले, संदीप वारे, अक्षय सुपे तसेच शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक एकनाथ पाटील, पोलीस अंमलदार नाथा जगताप, रघुनाथ हाळनोर, नितेश थोरात, सचिन भोई यांनी केली आहे.