चाकण (पुणे) : फॉलकॉन या परदेशी नामांकित कंपनीत मोठ्या पॅकेजचे आमिष दाखवून एका व्यक्तीची तब्बल २७ लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी एका महिलेसह तिघांवर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ३० ऑक्टोबर ते ९ डिसेंबर दरम्यान घडली आहे.
डेहीड, एडमंड रॉय, मेरी डिसिल्वा (पूर्ण नाव व पत्ता माहिती नाही, सध्या रा. चाकण, पिंपरी-चिंचवड) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. त्यांनी वेळोवेळी गुगल पे, फोन पे, आर. टी. जी. एस. एन. एफ. टी. द्वारे ऑनलाईन फसवणूक केल्याप्रकरणी हेमंत दादाजी जाधव (वय ५३, धंदा- नोकरी, रा. आयफेल सिटी, चाकण) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत चाकण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हेमंत जाधव हे मागील १२ वर्षांपासून वरील पत्त्यावर राहतात. तसेच एसएल पॉलिकॉन प्रा. लि. या कंपनीमध्ये क्वालीटी अॅशुरन्स हेड म्हणून नोकरी करतात. २१ सप्टेंबरला जाधव यांच्या मेल आयडीवर ‘आमच्याकडे क्वालीटी हेड या पदासाठी ऑफर असून, तुम्ही इंटरेस्टेड आहात का?’ अशी विचारणा झाली. जाधव यांनी त्यांना इंटरेस्टेड असल्याचा मेल केला.
दरम्यान, २३ सप्टेंबरला सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास डेव्हीड याने फोन करून मुलाखत घेतली व त्यानंतर एका तासाने पुन्हा त्याने फोन करून डॉ. एडमन रॉय, यांनी पुन्हा मुलाखत घेतली. २८ तारखेला डेव्हीड याने मला फोन करून, तुमची निवड झाली आहे, असे सांगून मेलवर ऑफर लेटर पाठवले. बेंगलोर येथील अॅडव्होकेट मेरी डिसिल्वा यांनी तुमची संपूर्ण केस पाहिली असे सांगून तिचा नंबर पाठवला.
दरम्यान, मेरी डिसिल्वाने व्हॉटसअॅपवर संपर्क साधून, व्हिसा तयार करणे, इंन्शुरन्स काढणे, बिजनेस ट्रॅव्हल अलाउंन्स, मेडिकल फी, व्हिसा टोकन तसेच अकाउंट अॅक्टीवेशन इत्यादी कारणे सांगून ३० ऑक्टोबर ते ९ डिसेंबर दरम्यान २६ लाख ९० हजार रुपयांची फसवणूक केली आहे. याबाबत चाकण पोलीस ठाण्यात वरील तिघांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेबाबत चाकण पोलीस गुन्हा दाखल करण्यास मागील एक महिन्यांपासून टाळाटाळ करीत होते. मात्र, तक्रारदारांनी “पुणे प्राईम न्यूजशी” संपर्क साधला असता, चाकण पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल केला आहे.