लोणी काळभोर : अल्पवयीन मुलींचा विनयभंग, छेडछाड असे प्रकार सातत्याने उघडकीस येत आहेत. ‘तुला आधार कार्ड काढून देतो’ असे सांगून तरुणीला बाहेर घेऊन गेला. तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. याबाबत पोलिसांकडे तक्रार केल्यावर जीवे मारण्याची धमकी देऊन जातिवाचक शिवीगाळ केली. या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी आरोपीवर बलात्कार व अॅट्रोसिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
मागील दीड वर्षापूर्वी व पुन्हा सोमवारी (ता. २९) दुपारी एकच्या सुमारास वडकी येथे हा प्रकार घडला. याबाबत मांजरी फार्म येथे राहणाऱ्या २४ वर्षीय तरुणीने मंगळवारी (ता. ३०) लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरुन विठ्ठल शिवाजी लांडगे (वय २५, रा. हेमाडे चाळ, हडपसर) या नराधमावर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, आरोपी आणि पीडित तरुणी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. आरोपीने तरुणीला ‘तुला आधार कार्ड देतो’ असे खोटे सांगून वडकी येथील एका लॉजमध्ये घेऊन गेला. त्याठिकाणी तरुणीच्या विरोधाला न जुमानता जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. याबाबत पोलिसांकडे तक्रार केली किंवा कोणाला सांगितले तर मारून टाकण्याची धमकी दिली. तसेच जातिवाचक शिवीगाळ केली. एवढ्यावरच न थांबता, आरोपीने फिर्यादीच्या राहत्या घरी येऊन वारंवार शरीर सुखाची मागणी केली.
आरोपी पीडित तरुणीला वारंवार त्रास देत होता. फोन करुन तिच्यासोबत अश्लिल भाषेत बोलत होता. स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल, असे संभाषण करून विनयभंग करत होता. या बाबींची नोंद फिर्यादीत करण्यात आली आहे.