पुणे : ड्रग्ज तस्कर ललित पाटील ससून रुग्णालयातून फरार झाल्यानंतर ससून रूग्णालय सातत्याने चर्चेत आले आहे. त्यानंतर रूग्णालयातील निवासी डॉक्टरांनी ३१ डिसेंबरला केलेल्या मद्य पार्टीवरून गदारोळ उडाला आहे. या प्रकरणी रुग्णालय प्रशासनाने नेमलेल्या चौकशी समितीने रुग्णालयात ओली पार्टी करणाऱ्या दोषी निवासी डॉक्टरांवर कठोर कारवाईची शिफारस केली असून, हा अहवाल वैद्यकीय शिक्षण आयुक्तांना पाठविण्यात आला आहे.
दरम्यान, डॉक्टरांच्या या ओल्या पार्टीची छायाचित्रे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर कार्यक्रमात दाखवून रुग्णालय प्रशासनाचे वाभाडे काढले होते. त्यानंतर या प्रकरणी रुग्णालय प्रशासनाने चौकशी समिती नेमली होती. मद्य पार्टीप्रकरणी १ जानेवारीला नेत्रविकार विभागाच्या प्रमुख डॉ. संजीवनी आंबेकर या समितीच्या अध्यक्ष होत्या. या समितीने चौकशी करून अहवाल अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांच्यासमोर सादर केला होता. मात्र, कारवाईबाबत काही प्रश्न उपस्थित झाल्याने या अहवालावर पुनर्विचार करण्यासाठी उपअधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांच्या नेतृत्वाखाली उपसमिती स्थापन करण्याचा निर्णय रुग्णालय प्रशासनाने घेतला. या उपसमितीने कारवाईचा अंतिम अहवाल अधिष्ठात्यांकडे नुकताच सादर केल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, या प्रकरणी कठोर कारवाई केली जाणार असल्याने रुग्णालय प्रशासनाने कारवाईचा अहवाल वैद्यकीय शिक्षण आयुक्त राजीव निवतकर यांच्याकडे पाठविला आहे. आयुक्तांकडून हा अहवाल वैद्यकीय शिक्षण विभागाचे मुख्य सचिव दिनेश वाघमारे यांच्यासमोर सादर केला जाईल. त्यानंतर त्यावर अंतिम निर्णय होईल, असे सूत्रांनी स्पष्ट केले.
ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे म्हणाले की, ससूनमधील ३१ डिसेंबरच्या घटनेप्रकरणी चौकशी समितीने कारवाईबाबतचा अहवाल सादर केला आहे. हा अहवाल वैद्यकीय शिक्षण आयुक्तांकडे पाठविण्यात आला आहे. त्यांच्याकडून तो अहवाल राज्य सरकारकडे सादर केला जाईल. या अहवालावर राज्य सरकारकडून अंतिम निर्णय घेतला जाईल.