पुणे : पुण्यामध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई केली आहे. जुना मुंबई-पुणे हायवेवर बनावट दारूच्या तब्बल ६० हजार बाटल्या जप्त केल्या असून ६०० बॉक्समध्ये लपवण्यात आलेल्या बनावट मद्याची किंमत २१ लाख रुपये इतकी असल्याचं राज्य उत्पादन शुल्क विभागाने सांगितलं आहे. जुन्या मुंबई-पुणे मार्गावर असलेल्या मामुर्डी गावाजवळ राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही कारवाई केली. या कारवाईत झुल्फिकार ताज आली चौधरी आणि अमित ठाकूर आहेर या दोघांना ताब्यात घेतलं आहे.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, २३ जानेवारी रोजी एक ट्रक जुना मुंबई-पुणे हायवेवरून मामुरडी गावाजवळून जाणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली. या माहितीनुसार, सापळा रचून अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तो ट्रक अडवून त्याची तपासणी केली असता ट्रकमध्ये गोवा राज्यात निर्मित बनावट देशी दारू रॉकेट असल्याचं उघडकीस आलं. पोलिसांना संत्रा ९० मि.ली. क्षमतेच्या ६०,००० बाटल्या मिळून आल्या. या मुद्देमालाची किंमत तब्बल २१ लाख रुपये इतकी आहे. या गुन्ह्यात १५ लाखाच्या वाहनासह एकूण ३६ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
जप्त बनावट देशी मद्य हे गोवा राज्यातील वडावल या ठिकाणी एका पत्र्याच्या गोडावूनमध्ये तयार केले जात आहे. ही बनावट मद्याची विक्री महाराष्ट्र राज्यात केली जात असल्याचं तपासात समोर आलं आहे. बनावट मद्याबाबतची माहिती समजल्याने या पथकामार्फत गोवा राज्यात जाऊन बनावट देशीमद्य निर्मितीच्या कारखान्यावर छापा टाकून बनावट देशी मद्य तयार करण्यासाठी लागणारा १ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल सीलबंद करण्यात आला आहे. या कारवाईत आतापर्यंत 38 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.