पिंपरी : तैवानला पाठविलेले पार्सल मुंबईत नार्कोटिक्स विभागाने पकडले आहे असं सांगून महिलेची दिशा भूल केली. त्या पार्सलची पडताळणी करण्यासाठी नार्कोटिक्स विभागाला फोन जोडल्याचे सांगून महिलेला स्काईपवरून व्हिडीओ कॉल केला. तसेच महिलेला बोलण्यात गुंतवून त्यांचे बँक खाते, आधारकार्ड यांची माहिती घेत तब्बल 19 लाख 4 हजार 101 रुपयांचे पर्सनल लोन काढून महिलेची फसवणूक केली आहे. ही घटना १ जानेवारी रोजी वाकड येथे ऑनलाईन पद्धतीने घडली.
याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात संबंधीत महिलेने रविवारी 28 जानेवारीला फिर्याद दिली असून यावरून आकाश कुमार, अमनी कोंडाल व बेनिफिशरी बँक खाते धारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी महिलेला आकाश नावाच्या व्यक्तीने फोन करुन तैवानमध्ये पाठवलेले पार्सल मुंबई येथील नार्कोटीक्स विभागामध्ये अडकले असून फोन नार्कोटिक्स विभागाला जोडत असल्याचे सांगून महिलेचे बँक खाते तपासायचे आहे, असे सांगितले.
महिलेला स्काईपवरून व्हिडिओ कॉल करून त्यांची कागदपत्रे आणि बँक खात्याची माहिती घेतली. महिलेला बँकेचे उपयोजन उघडायला लावून त्यांच्या खात्यावर नकळत १९ लाख ४ हजार रुपयांचे वैयक्तिक कर्ज काढले. पैसे महिलेच्या खात्यावर येताच त्यांनी बेनिफिशरी बँक खात्यावर वळती करून घेत महिलेची फसवणूक केली. पोलीस निरीक्षक साळुंखे तपास करत आहेत.