पुणे : पुण्यातील कसबा पेठ विधानसभा मतदार संघांचे कॉंग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्य्वर गुन्हा दाखल झाला आहे. आशानगर येथील पाण्याच्या टाकीच्या उद्घाटन प्रसंगी महापालिकेच्या अधिकाऱ्याला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करणं आमदार रवींद्र धंगेकर यांना चांगलंच भोवलं आहे. महापालिकेच्या अभियंता संघाच्या निषेधानंतर सोमवारी रात्री धंगेकर आणि इतर कार्यकर्त्यांवर चतुःशृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून आमदार धंगेकर यांच्याविरुद्ध कलम ३५३ नुसार सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोखलेनगर परिसरातील आशानगर येथे महापालिकेने उभारलेल्या पाण्याच्या टाकीचे लोकार्पण २६ जानेवारी रोजी करण्यात येणार होते.
या कार्यक्रमासला काँग्रेस पक्षाला डावलल्याचा आरोप काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी केला होता. शासकीय कार्यक्रमाच्या अगोदरच टाकीचे उद्घाटन करण्यासाठी काँग्रेसचे नेते, कार्यकर्ते कार्यक्रमाच्या ठिकाणी आले होते. त्यांनी टाकीजवळ जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना अडविल्यावर झालेल्या वादावादीत धंगेकर यांनी महापालिका अधिकाऱ्याला अर्वाच्या भाषेत शिवीगाळ केली.
या सर्व प्रकाराचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. त्यानंतर महापालिकेच्या अभियंता संघाने सोमवारी महापालिकेत सभा घेऊन या प्रकरणाचा निषेध केला. त्यानंतर अधिकाऱ्यांनी चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.