मुंबई: महात्मा गांधीजींची हत्या ही नथुराम गोडसेच्या पिस्तुलातून झाडलेल्या गोळीने झाली नसल्याचा दावा रणजीत सावरकर यांनी केला आहे. ते एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलत होते, तेव्हा त्यांनी हा दावा केला आहे. त्यांच्या हत्येचा तपास हा व्यवस्थित झाला नाही, त्यामुळे गांधी हत्येचा फायदा फक्त नेहरू घराण्याला झाला असं सावरकर म्हणाले. फॉरेन्सिक तपासातून पुढे आलेल्या गोष्टींवरून आपण हे वक्तव्य करत आहोत, असंही त्यांनी म्हटले आहे. गांधी यांच्या हत्येनंतर वीस वर्षांनी जसा कपूर कमीशन नेमला तसा दुसरा कमीशन नेमून दडपलेले पुरावे बाहेर काढावेत, अशी मागणी देखील सावरकर यांनी केली आहे.
76 वर्षांपूर्वी अशी घटना घडली ज्यामुळे जगाचं राजकारण पूर्णपणे बदलले गेले. त्याचा डाग सावरकर यांच्यावर लावला गेला. तसेच नथूराम गोडसेने महात्मा गांधीजींची हत्या केल्याचं सांगितलं गेले. त्यानंतर मी कपूर कमीशनचा अभ्यास सुरू केला. तो अहवाल काँग्रेस सरकारने नाकारला नाही आणि स्वीकारला नाही. यामध्ये नथुराम गोडसे यांचे क्रॉस व्हेरिफिकेशन झालं नाही. नथुराम गोडसे यांनी मारलेल्या पिस्तुलातील गोळ्यातून महात्मा गांधी यांचा खून झाला नाही. पिस्तुलातून सुटलेल्या गोळीचा आकार वेगळा आहे. मी या सगळ्याचा अभ्यास केला, असंही रणजीत सावरकर यांनी म्हटले आहे.
दोन फुटांवरून अशा गोळ्या मारणे शक्य नाही. गांधी यांना मारलेल्या गोळीचा अँगल देखील वेगळा होता. फॉरेन्सिकचा अहवाल ज्या गोळीबारावर आधारित आहे, त्याचा फोटो जोडला आहे. पोलिसांनी पंचनामे देखील खोटे बनवले आहेत. हे सर्व मी माझ्या पुस्तकात लिहिले आहे. नथुराम गोडसे हे महात्मा गांधी यांना मारायला आले होते, हे खरं आहे. त्यांनी गोळ्याझाडल्या हेही शंभर टक्के खरे आहे. परंतु, नथुराम गोडसे याच्या पिस्तुलातून झाडलेल्या गोळीतून गांधींचा खून झाला नाही. नंतर या प्रकरणाचा तपास नीट झाला नाही. याबाबत मी केंद्राकडे तपासाची मागणी करणार नाही, ही मागणी लोकांनी करावी. तसेच संबंधित पुस्तक प्रकाशित होऊ नये यासाठी माझ्यावर दबाव आणला गेला. पण मी हे पुस्तक स्वतः प्रकाशित केलं. त्यावेळी अनेक प्रकाशकांनी शेवटच्या क्षणी प्रकाशनाला नकार दिला होता, असेही सावरकर म्हणाले.