पुणे : संचालक मंडळाने खोतीदार व्यापाऱ्यांवर केलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी रयत शेतकरी संघटनेच्या शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मांजरी उपबाजारात जोरदार आंदोलन करून घोषणा दिल्या अन् परिसर दणाणून सोडला. दोन दिवसांत खोतीदार व्यापाऱ्यांना परवानगी मिळाली नाही, तर हजारोंच्या संख्येने शेतकरी मार्केटमध्ये जमा होऊन सामुदायिक आत्मदहन करतील, असा इशारा या वेळी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला. दरम्यान, संचालक मंडळाच्या निर्णयाविरुद्ध शेतकरी आक्रमक झालेले असताना, आडमुठ्या धोरणामुळे निर्णय रखडल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळांने तीन महिन्यांपासून मांजरी उपबाजारात खोतीदार व्यापाऱ्यांना मज्जाव केला. त्यामुळे तीन तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या लाखो रुपयांच्या मालाचे नुकसान होत असल्याने, आज रयत शेतकरी संघटनेने मोर्चा काढून संचालक मंडळाच्या मनमानी विरोधात हल्लाबोल केला.
रयत शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविप्रकाश देशमुख, शेतकरी नेते पांडा आप्पा काळे, प्रदेशाध्यक्ष रामदास पाटील कोतवाल, माजी नगरसेवक मारुती आबा तुपे, माजी संचालक विलास भुजबळ, पश्चिम महाराष्ट्र विभागाचे उपाध्यक्ष हेमंत चौधरी, प्रदेश उपाध्यक्ष अजय सावंत, जिल्हाध्यक्षा कल्पना गव्हाणे, माजी सरपंच सचिन तात्या तुपे, भाजप पुणे उपाध्यक्ष जीवन जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रविण शिवाजीराव कामठे, कुंजीरवाडीचे उपसरपंच गोकुळ भाऊ ताम्हाणे, अंकुश हंबीरराव, शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश कामठे, टी. के. महाडिक, रयत शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष बबन गायकवाड, दौंड तालुका वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष बापू जगताप, आतकीरे ताई यांच्यासह हजारो शेतकरी बांधवांनी या आक्रोश मोर्चात सहभाग नोंदवला.
आंदोलनानंतर बाजार समितीचे विभागप्रमुख किरण घुले यांना निवेदन देण्यात आले. दोन दिवसांत तोडगा काढण्याची आग्रही भूमिका मांडण्यात आली. खोतीदार व्यापाऱ्यांच्या वतीने बाळासाहेब भिसे यांनी बाजाराच्या प्रवेशद्वारासमोरच आमरण उपोषण आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनकर्ते शेतकरी संघटना व शेतकऱ्यांनी या उपोषणाला पाठिंबा दिला. संचालक मंडळाने निर्णय बदलला नाही तर मांजरी उपबाजारातील व्यापाऱ्यांना माल बाहेर नेऊ देणार नाही, असा इशारा शेतकरी भरत काळभोर यांनी दिला.
संचालक मंडळाच्या मनमानी विरोधात आणि खोतीदारांच्या न्याय्य हक्कासाठी शेतकऱ्यांनी सामूहिक आत्मदहन आंदोलन करण्याचा इशारा प्रदेशाध्यक्ष रामदास पाटील कोतवाल यांनी दिला. शेतकरी संघटनेचे नेते सामुहिक आत्मदहन करणार, उपोषणकर्ते स्वतःची तिरडी बांधून मरणाची वाट पहात आहेत. तरी या सरकारचे डोळे का उघडत नाहीत, असा सवाल संतप्त शेतकरी करत आहेत.