हडपसर, (पुणे) : कष्टाच्या पैशाने घेतलेला मोबाईल हरवल्यानंतर किंवा गर्दीच्या ठिकाणी चोरी झाल्यानंतर आपण परत मिळण्याची आशा सोडून दिलेली असते. तरीही औपचारिकता म्हणून पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी जात असतो. मात्र, अशाच दाखल झालेल्या तक्रारींचा छडा लावून तब्बल ३१ मोबाईल शोधण्याची किमया हडपसर पोलिसांच्या सायबर पोलिस ठाण्याने केली आहे.
केंद्र शासनाच्या दुरसंचार विभागाद्वारे हरवलेल्या किवा चोरीस गेलेल्या मोबाईलची माहीती मिळवणे संदर्भात एक प्रणाली सुरू करण्यात आली आहे. याच CEIR पोर्टलचा वापर करून हडपसर पोलीस ठाण्याचे सायबर विभागाचे प्रमुख सुशिल डमरे (पोलीस उप निरीक्षक), महिला पोलीस अंमलदार गायत्री पवार, माधुरी डोके, आणि सोनाली कुंभार यांच्या टिमने हरविलेले मोबाईल शोधण्याचे काम केलं आहे.
सायबर टिमने हरवलेल्या मोबाईलची माहिती संकलित केली. त्यानंतर फोन वापरकर्त्यांशी संपर्क साधुन मोबाईल आणि कागदपत्रांची ओळख पटवून संबंधित नागरिकांना मोबाईल देण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. कर्नाटक, बिहार या राज्यांमधून तसेच महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून एका महिन्यामध्ये तब्बल ७ लाख रुपये किंमतीचे ३१ मोबाईल शोधून काढले.
नागरीकांना हरवलेला मोबाईल मिळण्याची अपेक्षा नसतानाही तो परत मिळाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले. नियुक्त केलेल्या पथकांनी मागील एक महिन्यांमध्ये तांत्रिक तपास करून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून अंदाजे ७ लाख रुपये किंमतीचे ३१ मोबाईल संच शोधून काढले.
या पथकाने शोधून काढले मोबाईल
ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, पूर्व प्रादेशिक विभागचे अप्पर पोलीस आयुक्त, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५ चे आर. राजा यांच्या मागदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त, अश्विनी राख, हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र शेळके, पुणे शहर पोनि. (गुन्हे) विश्वास डगळे, पोनि (गुन्हे) संदिप शिवले, यांच्या सुचनाप्रमाणे सायबर पथकाचे पोलीस उप निरीक्षक, सुशिल डमरे, महिला पोलीस अंमलदार, गायत्री पवार माधुरी डोके, आणि सोनाली कुंभार यांचे पथकाने केली.