पुणे : पुण्यातील सेनापती बापट रस्त्यावर १३ वर्षांपूर्वी खून करण्यात आला होता. हत्त्या करून पसार झालेल्या सुरक्षारक्षकाला चतु:शृंगी पोलिसांनी राजस्थानातून अटक करण्यात आली आहे. खून केल्यानंतर पसार झालेला आरोपी राजस्थानात चणे-फुटाण्यांची विकी करत असल्याचे उघडकीस आले आहे. बिट्टी ऊर्फ श्यामबाबू छोटेलाल यादव असं अटक करण्यात आलेल्या आरोपीच नाव आहे.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, सेनापती बापट रस्त्यावरील अंबिका सोसायटीतील नियोजित गृहप्रकल्पात राजा ऊर्फ रज्जवा रामकेश यादव आणि बिट्टी ऊर्फ श्यामबाबु यादव सुरक्षा रक्षक होते. १५ मार्च २०११ रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास सिक्युरिटी एजन्सीतील पर्यवेक्षक बाबुराव मोघेकर तपासणीसाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्याशी दोघांचा वाद झाला होता. यानंतर दोघांनी मोघेकर यांचा खून केला.
या घटनेनंतर श्यामबाबू यादव हा पसार झाला होता. श्यामबाबू उत्तरप्रदेशातील चित्रकुट जिल्हयातील रहिवाशी आहे. चतु:शृंगी पोलिसांचे पथक चित्रकुटमधील पहाडी गावात गेले होते. मात्र, त्याचा ठावठिकाणा लागला नव्हता. दरम्यान त्याचा मोबाइल क्रमांक पोलिसांच्या हाती लागला होता. तांत्रिक तपासात तो राजस्थानमधील झालावाड जिल्ह्यात वास्तव्यास असल्याचं निष्पन्न झालं. पोलीस पथकाने तेथून त्याला ताब्यात घेतलं. तेव्हा तो राधेश्याम नावाने तेथे राहत असल्याचे आढळून आले.
ही कामगिरी चतु:शृंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण, उपनिरीक्षक अंगद नेमाणे, हवालदार सचिन कांबळे, सुहास पोतदार, सुधाकर माने, अस्लम अत्तार, गोकुळ घुले यांनी केली.