मुंबई : मनोज जरांगे यांच्यासोबत चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत. मागासवर्गीय आयोगाचा अहवाल फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात पोहोचेल आणि तात्काळ विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाला अधिकचे आरक्षण देण्याचा निर्णय घेऊ, असे हसन मुश्रीफ म्हणाले आहेत.
मनोज जरांगें यांना आंदोलन करायचे असेल तर फेब्रुवारीचा पहिला आठवडा वगैरे बघून त्यांनी आंदोलन करावे. आता विनाकारण मुंबईमध्ये नागरिकांची प्रचंड मोठी कोंडी होणार आहे, असे हसन मुश्रीफ म्हणाले. वाशीतच आंदोलन मागे घेण्याची मनोज जरांगेंना शिष्टमंडळाची विनंती होती. तर, आझाद मैदानात जात घोषणा करण्यावर जरांगे आग्रही होते, मुंबईत येण्यावर ठाम राहिल्यास अटल सेतू वापराची विनंती शिष्टमंडळाकडून करण्यात आली होती.
मुख्यमंत्री मनोज जरांगेंसोबत चर्चामध्ये आहेत. काहीतरी तोडगा निघेल. मराठा आरक्षणावर देण्याची भूमिका सरकारची आहे. तर थोडा वेळ वाट पाहण्याची गरज आहे, असे हसन मुश्रीफ म्हणाले. सरकार मराठा समाजाला टिकणार आरक्षण देण्यासाठी अतिशय गंभीर आहे. कुणबी दाखले देण्यासाठी अधिकारी रात्रंदिवस काम करत आहेत. हे सर्व बघून मराठा समाजाने आणखी थोडं वाट पहावी असे आवाहन करण्यात आले.