चंद्रपूर : युवा सेनेच्या शहर प्रमुखाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. चंद्रपूरच्या उच्चभ्रू सरकारनगर भागात चाकूने सपासप वार करून हत्या केली गेली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरु केला आहे. 30 वर्षीय शहर प्रमुखाचा मृतदेह त्याच्याच एका मित्राच्या कार्यालयाजवळ सापडल्याने परिसरात तणाव निर्माण झाला आहे. मृत व्यक्तीच्या समर्थकांनी संशयित आरोपीच्या जेसीबी आणि हायवा वाहनांची मोडतोड केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत शिवा वझरकर आणि आरोपी मित्रांमध्ये काही वाद झाला होता. तो वाद मिटवण्याकरता वझरकर हे मित्रांना भेटायला गेले होते. मात्र, त्याठिकाणी बाचाबाची झाली आणि वाद वाढला. या वादात शिवा वझरकर यांच्या पोटात धारदार शस्त्राने वार करुन हत्या करण्यात आली. या हल्ल्यात शिवा वझरकर यांचा जागीच मृत्यू झाला. शिवा वझरकर यांचा परस्पर मित्रांमध्ये वाद झाला होता. हा वाद वझरकरकडून सोडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र झालेल्या मारहाणीत वझरकर यांचा मृत्यू झाला, असे शिवसेना उबाठा गटाचे जिल्हा प्रमुख संदीप गिऱ्हे यांनी सांगितले.
पोलीस विभाग प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने हाय अलर्टवर असतानाच या हत्येनंतर शहरातील पोलीस बंदोबस्त आणखी वाढवण्यात आला आहे. वझरकर याचा मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयातील शव चिकित्सा कक्षात रवाना करण्यात आला आहे. मित्रांशी झालेल्या वादाचे हत्येत पर्यवसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केली जात आहे.