मुंबई : मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील गुरुवारी रात्री २५ जानेवारी ला नवी मुंबईत पोहचले आहेत. त्यांच्यासोबत लाखो मराठा बांधव देखील मुंबईत दाखल झाले आहेत. आंदोलकांची गर्दी इतकी होती की नवी मुंबईतील सर्व रस्ते चक्का जाम झाले. काळ रात्री मनोज जरांगे पाटील यांच्यासह लाखो मराठा बांधवानी वाशी येथील एपीएमसी (MPMC) मार्केटमध्ये मुक्कामाला होते . नवी मुंबईतील गर्दी पाहून सरकारची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे मराठ्यांचं वादळ थोपवण्यासाठी सरकारचेही प्रयत्न सुरु आहेत.
यावेळी स्थानिक मराठा संघटनांकडून जरांगे यांच्यासह आंदोलकांच्या जेवणाची तसेच राहण्याची सोय करण्यात आली होती. यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता. नवी मुंबई महापालिका देखील दिमतीला हजर होती. महापालिकेने पाण्याचे टँकर तसेच फिरते शौचालय सुविधा दिली होती.
दरम्यान, आज मनोज जरांगे यांची वाशी येथे जाहीर सभा पार पडणार आहे. या सभेनंतर ते मुंबईतील आझाद मैदानाच्या दिशेने मार्गस्थ होणार आहेत. त्यामुळे मुंबईतील रस्त्यांना आंदोलनाचं स्वरुप येण्याची शक्यता आहे. दुसरीकडे मनोज जरांगे यांची मनधरणी करण्यासाठी शिंदे सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. गुरुवारी सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे यांची भेट घेऊन चर्चा केली. मात्र, ही चर्चा निष्फळ ठरली. आज पुन्हा सरकारच शिष्टमंडळ जरांगे यांची भेट घेणार आहे. या भेटीत नेमका काय मार्ग निघणार? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिले आहे.