यवत : दुचाकी चोरीप्रकरणातील दोन आरोपींना यवत पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने कारवाई करत अटक केली. हे दोन्ही चोरटे रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती दिली जात आहे.
यवत गुन्हे शोध पथक, पाटस पोलीस दूरक्षेत्र हद्दीत खाजगी वाहनाने पेट्रोलिंग करत असताना दुचाकीवर किरण लक्ष्मण खराडे (वय २३ रा. हिंगणीगाडा ता. दौंड जि. पुणे) यांच्याकडे दुचाकीच्या कागदपत्रांबाबत विचारणा केली असता समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने सखोल चौकशी केली असता ही दुचाकी मित्र आदेश देशमुख (रा. बारामती जि पुणे) याने सहा महिन्यांपूर्वी दिल्याचे सांगितले.
त्यानंतर यवत गुन्हे शोध पथकाने बारामती पेन्सिल चौक येथून आदेश रमेश देशमुख (वय २४ सध्या रा.तांबे नगर ता. बारामती जि. पुणे मूळ रा.कडा ता.आष्टी, जि. बीड) यास ताब्यात घेऊन चौकशी केली. तेव्हा त्याने गाडी दोन वर्षांपूर्वी सुभद्रा मॉल बारामती येथून चोरली असल्याचे सांगितले. आदेश देशमुख याच्यावर बारामती पोलीस स्टेशन येथे दोन गुन्हे दाखल असून, किरण लक्ष्मण खराडे याच्यावर यवत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे.
दरम्यान, ही कामगिरी यवत पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाने पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे यांच्यासह वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख, पोलीस हवालदार निलेश कदम,गुरूनाथ गायकवाड यांच्या पथकाने केली. याप्रकरणी आरोपींना बारामती तालुका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.