राहुरी : राहुरी तालुक्यात एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या तरूणाविरूद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिला आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला गेला. तरुणाविरुद्ध अपहरणासह बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
शुभम राजेंद्र सत्रे (रा. देवळाली प्रवरा) असे आरोपीचे नाव आहे. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. अल्पवयीन पीडितेने फिर्याद दिली. फिर्यादीत म्हटले की, बारावीमध्ये शिक्षण घेत आहे. महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ उभी असताना तिथे आरोपी शुभम सत्रे आला. त्याने माझे तुझ्यावर प्रेम आहे. आपण पळून जाऊन लग्न करू, असे सांगून दुचाकीवर गुहा येथील हॉटेल मैत्री येथे नेले.
तेथे तुझ्या आई-वडिलांना मारून टाकीन, अशी धमकी देऊन जबरदस्तीने अत्याचार केला. त्यानंतर अहमदनगर येथे नेले. तेथून चारचाकी वाहनातून अहमदनगर ते बीड रस्त्यावर असलेल्या एका गावात नेऊन एका रुममध्ये ठेवले. पहाटे अडीच वाजता आरोपीचे चुलत आजोबा आले. त्यांना पाहून आरोपीने पळ काढला. आरोपीच्या चुलत आजोबांनी घरी आणून सोडले, असे फिर्यादीत म्हटले आहे. या पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक समाधान फडोळ करीत आहेत.