पुणे : पुण्यातील चतु:श्रृंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. बदनामी करण्याची धमकी देऊन एका विवाहित महिलेकडे शारीरिक संबंधाची मागणी केली. तसेच मुलाच्या जीवाच बरे वाईट करण्याची देखील धमकी दिली.
हा प्रकार चतु:श्रृंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या पीडित महिलेच्या घरी ऑगस्ट २०२३ ते २३ जानेवारी या काळात घडला आहे. याप्रकरणी पीडित महिलेने २३ जानेवारीला चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून अजय नागटिळक (वय अंदाजे ३० ते ३५, रा. इंदिरा वसाहत, गणेश खिंड रोड, औंध) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादी महिलेच्या ओळखीचा आहे. आरोपी अजय याने फिर्यादी यांच्या घरी येऊन त्यांच्या पतीसोबत ओळख वाढवली. त्यानंतर आरोपीने महिलेला ‘तु मला आवडतेस माझ्या सोबत शारीरिक संबंध ठेव नाहीतर मी तुझी बदनामी करेल’ अशी धमकी दिली.
तसेच पतीला खोटे सांगून मुलाच्या जिवाचे बरे वाईट करेन असे मेसेज महिलेच्या मोबाईलवर पाठवले. याबाबत महिलेने पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर पोलिसांनी आरोपीवर विनयभंग आणि अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक शानमे करत आहेत.