पुणे : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा आज पुण्यात येणार आहे. या मोर्चाच्या मार्गावर पुणे पोलिसांकडून मोठा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. १००० पोलिस कर्मचारी, राज्य राखीव पोलिस दलाच्या २ तुकड्या, दंगलनियंत्रक पथक, गृहरक्षक दलाचे ८०० जवान तैनात करण्यात येणार आहेत. नगर रस्तामार्गे मोर्चा कोरेगाव भीमा येथे येणार आहे.
कोरेगाव भीमा परिसराचा समावेश पुणे पोलिस आयुक्तालयातील लोणीकंद पोलिस ठाण्याच्या हद्दीत होतो. मंगळवारी २३ जानेवारी रोजी मराठा समाजाचा मोर्चा खराडी-वाघोली परिसरात मुक्कामी असणार आहे. वाघोली येथील आर. के. फार्मच्या मोकळ्या जागेत मुक्काम असणार आहे. या पार्श्वभूमीवर १००० प्रसाधनगृह, रुग्णवाहिका, १०० पाण्याचे टँकर, आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी दिली आहे.
परिमंडल-४ चे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांच्यासह २ पोलिस उपायुक्त, ६ सहायक पोलिस आयुक्त, २८ पोलिस निरीक्षक, १२३ सहायक पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षक तसेच १००० पोलिस कर्मचारी, गृहरक्षक दलाचे जवान, राज्य राखीव पोलिस दलाच्या २ तुकड्या बंदोबस्तावर राहणार आहेत. २४ जानेवारी रोजी मोर्चा मुंबईकडे मार्गस्थ होणार असून, लोणावळा येथे मुक्कामी असणार आहे.