पुणे : विद्युत खांबांमधील विजेचा प्रवाह पाण्यात अथवा तारेच्या कुंपणात उतरून शॉक लागण्याच्या घटना विशेषतः पावसाळ्यात वारंवार घडतात. यामुळे निष्पाप जिवांचा बळी जातो. अशा दुर्घटना टाळण्यासाठी आता महापालिकेने पुढाकार घेतला आहे. शहरात फायबर रिइन्फोर्स पॉलिमर म्हणजेच ‘शॉक प्रूफ’ विद्युत खांब बसविण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात महापालिकेतर्फे एक हजार विद्युत खांब बसविण्यात येणार आहेत. त्यात म्हाळुंगे रस्ता, सूस या भागांचा समावेश आहे.
महापालिकेतर्फे पहिल्या टप्प्यात एक हजार खांब बदलण्यात येणार आहेत. जुने खांब काढून नवीन शॉक प्रूफ असलेले विद्युत खांब टाकले जाणार आहेत. विशेष म्हणजे जुन्या विद्युत खांबांच्या तुलनेत नवीन एफआरपी खांब ५ ते १० टक्के स्वस्त आहेत. यामुळे नागरिकांचे लाख मोलाचे जीव वाचणार आहेत. तसेच महापालिकेची बचत होणार आहे. एफआरपी विद्युत खांब मजबूत, पारदर्शी, कमी वजनाचे आहेत. या खांबांना गंज लागत नाही. यामुळे ते दीर्घकाळ ते टिकतात. आगीसारख्या घटनांचा या खांबांबर परिणाम होत नाही. सुरक्षित असलेले ‘एफआरपी’ शॉक प्रूफ विद्युत खांब बसवण्याची अंमलबजावणी सुरु केली जात आहे.
सध्याच्या विद्युत खांबांच्या अर्थिंग आणि देखभाल दुरुस्तीसाठी महापालिकेला खर्च करावा लागतो. दरवर्षी पावसाळ्याआधी १० ते १५ लाख रुपयांचा खर्च होत असतो. परंतु आता नवीन ‘एफआरपी’ खांबाला अर्थिंगची गरज नाही. यामुळे दरवर्षी अर्थिंगच्या होणाऱ्या खर्चात बचत होणार आहे.