नवी दिल्ली : प्रभू श्रीरामांचा प्राणप्रतिष्ठापणा सोहळा संपन्न झाला, प्रभू श्रीराम अयोध्येतील राम मंदिरात विधीवत विराजमान झाले आहेत.पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली. १२ वाजून २० मिनिटांनी प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठापणा करण्यात आली आहे. प्राणप्रतिष्ठेनंतर गर्भगृहातील रामललाची पहिली छायाचित्रे समोर आली आहेत. रामललाला सोन्याच्या दागिन्यांनी मढवण्यात आले आहे. तसेच, त्याच्या हातात सोन्याचा धनुष्यबाण आहे. प्रभू रामचंद्राचे तेजस्वी रुप पाहून डोळ्यांचे पारण फिटते आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर लिहिलंय की, “अयोध्येमध्ये श्री रामाच्या अभिषेकचा अलौकिक क्षण सर्वांनाच भावूक करणारा आहे. या दैवी कार्यक्रमाचा एक भाग होणं माझ्यासाठी खूप आनंददायी आहे. जय सिया राम.” या सोहळ्यासाठी कुर्ता आणि धोतर असा खास पेहराव पंतप्रधानांनी केला आहे.
राम मंदिर प्राण प्रतिष्ठेच्या निमित्तानं अयोध्येतील मंदिराला फुलांची सुंदर सजावट करण्यात आली आहे. सजावटीसाठी तब्बल 2 हजार 500 क्विंटल फुलांचा वापर करण्यात आला असून, दिल्ली कोलकाता इथूनच नव्हेतर थेट थायलंड आणि अर्जेंटिनामधूनही मंदिरासाठी फुलं आणली आहेत. गुजरातमधील माळी समाजानंही मंदिरासाठी 300 क्विंटल फुलं भेट दिली आहेत.
भव्य मंदिरावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. सरसंघचालक मोहन भागवत, सुपरस्टार रजनीकांत, महानायक अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, माधूरी दिक्षीत, कंगना रानौत, जवळपास ६००० नामांकीत लोक अयोध्येत दाखल झाले आहेत.