मुंबई : मुंबई मॅरेथॉनची स्पर्धा नुकतीच पार पडली. या स्पर्धेत हजारो नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मात्र, स्पर्धेदरम्यान एक दुर्देवी घटना घडली आहे. मॅरेथॉनमध्ये धावत असताना दोन व्यक्तींचा दुर्देवी मृत्यू झाला. राजेंद्र चंदमल बोरा (वय ७४) आणि सुव्रदीप (वय ४५) अशी मृतांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या 22 जणांना डिहायड्रेशन आणि इतर कारणांमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ७५ वर्षीय व्यक्ती राजेंद्र चंदमल बोरा यांना संपूर्ण ४२ किलोमीटर मॅरेथॉन धावताना हृदयविकाराचा झटका आला. बोरा मरीन ड्राईव्हवर धावताना अचानक कोसळले. त्यामुळे जवळच्या लोकांनी त्यांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र डॉक्टरांनी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले.
तसेच सुवर्णदीप बॅनर्जी (४६) यांचाही मॅरेथॉनदरम्यान बेशुद्ध पडल्याने मृत्यू झाला. बॅनर्जी वरळी येथून मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले होते. ते अचानक खाली पडले. पोलिसांनी त्यांना नायर रुग्णालयात दाखल केले, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांनाही मृत घोषित केले. बॅनर्जी यांच्या मृत्यूचे कारण अध्याप स्पष्ट झालेलं नाही.
एशियन हार्ट इन्स्टिट्यूट (AHI) च्या डॉक्टरांनी सांगितले की, १८२० धावपटूंपैकी २२ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी १९ जणांना संध्याकाळपर्यंत सोडण्यात आले. यातील बहुतेक जणांना स्नायू पेटके, हायपोग्लाइसेमिया, जखम, थकवा आणि निर्जलीकरण असा त्रास होता.