पुणे : कुख्यात गुंड शरद मोहोळ खून प्रकरणाचा मास्टर माइंड गणेश मारणे अद्यापही फरार आहे. मोहोळ याचा खून झाल्यानंतर पळून जाण्यासाठी मुख्य सूत्रधार विठ्ठल शेलार याने वापरलेली बुलेटप्रूफ स्कॉर्पिओ पोलिसांनी २० जानेवारीला जप्त केली. दरम्यान, पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतलं असून, ही घटना घडण्यापूर्वी तो मारणे याच्या आणि गुन्हा घडल्यानंतर तो शेलार याच्या संपर्कात असल्याचे निष्पन्न झाले आहे.
विठ्ठल शेलार आणि अन्य आरोपी रामदास उर्फ वाघ्या मारणे यांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्यावर त्यांना शनिवारी २० जानेवारीला न्यायालयात हजर करण्यात आले होते. नव्याने निष्पन्न झालेल्या साथीदाराबाबत शेलार आणि रामदास मारणे यांची चौकशी करणे बाकी आहे. तसेच, शेलार याने गणेश मारणेसोबत ज्याठिकाणी मोहोळला मारण्याचा कट रचला ते ठिकाण शेलार याने पोलिसांना दाखविले आहे.
रामदास मारणे आणि शेलार यांच्याकडे गुन्ह्याचा अधिक तपास करायचा असल्याने त्यांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी सरकारी वकील नीलिमा इथापे-यादव यांनी केली आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. सी. बिराजदार यांनी ती मागणी मान्य करीत आरोपीच्या पोलीस कोठडीत येत्या २४ जानेवारीपर्यंत वाढ केली आहे.
बुलेटप्रूफ चारचाकीसह सहा महागड्या गाड्या जप्त
दरम्यान, शेलार याच्या बुलेटप्रूफ चारचाकीसह पोलिसांनी आत्तापर्यंत या गुन्ह्यात एकूण सहा महागड्या गाड्या जप्त केल्या आहेत. शरद मोहोळ खुनाचा मास्टर माइंड गणेश मारणे याच्या शोधासाठी पोलिसांची पथके वेगवेगळ्या ठिकाणी रवाना झाली आहेत. मारणे याने अटकपूर्व जामिनासाठी खटपट सुरू केल्याची माहिती पोलिसांना मिळाली असून, त्यादृष्टीने काही जणांच्या फोनवर नजर ठेवण्यात आली आहे. त्याचबरोबर मारणे याच्या टोळीतील काही प्रमुख गुंडांकडे कसून चौकशी सुरू आहे.