पुणे : पुण्यातील पाषाण परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमाला विरोध केल्याने प्रेयसीच्या आईचा तरुणाने पट्ट्याने गळा आवळून खून केल्याची खळबळजनक घटना पाषाण-सूस रस्त्यावरील एका सोसायटीमध्ये घडली आहे. ही घटना शनिवारी २० जानेवारीला उघडकीस आली. या प्रकरणी तरुणाला चतुःशृंगी पोलिसांनी अटक केल्याची माहिती समोर आली आहे.
शिवांशू दयाराम गुप्ता (वय २३, रा. मोहनवाडी, येरवडा) हे संशयित आरोपीचे नाव आहे. याबाबत एका तरुणीने चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही तरुणी आणि शिवांशू यांचे गेल्या ७ महिन्यांपासून प्रेमसंबंध होते. काही दिवसांपासून त्यांच्यात सतत वादविवाद होत होते. त्यामुळे तिने शिवांशूसोबत प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिला होता.
आईनेच तिला नकार द्यायला सांगितल्याच त्याला समजले. त्यामुळे तो या तरुणीच्या आईवर चिडला होता. शिवांशू शनिवारी रात्री बाराच्या सुमारास माउंटव्हर्ट अॅल्टसी सोसायटीत गेला. त्याने तिच्या आईशी भांडणे केली. त्यानंतर त्यांचा पट्ट्याने गळा आवळून खून केला. सुरुवातीला याप्रकरणी आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली होती. चौकशीनंतर वर्षा यांचा खून झाल्याचे उघडकीस आले. त्यानंतर पोलिसांनी आरोपी शिवांशूला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.