पिंपरी : मोशी येथे लवकरच नवीन न्यायसंकुल उभारण्यात येणार असल्याची माहिती पिंपरी-चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. रामराजे भोसले यांनी दिली.
याबाबत ॲड. रामराजे भोसले म्हणाले की, “पुणे जिल्हा व सत्र न्यायालय येथे पोक्सो (POCSO) न्यायालयाच्या इमारतीचा कोनशिला, तसेच भूमिपूजन समारंभ रविवारी (दि.२१) न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे यांच्या हस्ते तसेच न्यायमूर्ती संदीप मारणे, न्यायमूर्ती डॉ. आरिफ यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
यावेळी पिंपरी-चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनच्या वतीने मोरवाडी येथील न्यायालयामध्ये दोन अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय आणि दोन दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर न्यायालय लवकर सुरू करावेत, अशी मागणी पिंपरी-चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनच्या वतीने प्रत्यक्ष भेटून आणि त्यापूर्वी पत्राद्वारे करण्यात आली. तसेच मोशी येथे होणाऱ्या न्यायसंकुलाचे भूमिपूजन सुद्धा लवकर करावे, अशी पत्राद्वारे विनंतीदेखील करण्यात आली होती.
त्यावर न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे यांनी प्रत्यक्ष भेटीमध्ये आणि भूमिपूजन समारंभाच्या आपल्या मनोगतात उल्लेख करत मोशी येथे होणाऱ्या न्यायसंकुलासाठी आवश्यक असलेल्या सर्वच परवानग्या मिळाल्या असून, फक्त पर्यावरण संदर्भातील परवानग्या मिळणे बाकी आहेत; परंतु त्याही लवकरच मिळतील, असे या कार्यक्रमप्रसंगी न्यायमूर्ती मोहिते यांनी आवर्जून सांगितले.
पिंपरी-चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष ॲड. रामराजे भोसले, सचिव ॲड. धनंजय कोकणे, सहसचिव ॲड. उमेश खंदारे, ॲड. अतिश लांडगे, ॲड. मानसी उदासी, ॲड. बालाजी देशमुख, ॲड. विवेक राऊत, ॲड. शुभम खैरनार यावेळी उपस्थित होते.