बारामती, (पुणे) : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज आपल्या शाळेतील आठवणींना उजाळा दिला आहे. ५० वर्षांपूर्वीच्या शालेय जीवनातील क्षण त्यांच्या नजरेसमोरून तरळून गेले. बारामतीतील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या क्रीडावर्धिनिच्या वतीने २० जानेवारीला म. ए. सो. क्रीडाकरंडकाच्या पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी अजित पवार उपस्थित होते.
इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंत बारामतीतील म. ए. सो. च्या शाळेत अजित पवार यांनी शिक्षण घेतले. आजच्या कार्यक्रमादरम्यान शाळेने त्यांच्या काळातील त्यांचे नाव असलेले रजिस्टर आवर्जून त्यांना दाखविण्यासाठी आणले होते. त्या रजिस्टरमधील त्यांनी त्यांच्या नावासह विद्यार्थी त्यांच्यासमवेत असलेल्या मित्रांच्या नावावरही नजर टाकली. यामुळे त्यांच्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या.
या कार्यक्रमाप्रसंगी त्यांनी भाषण केले. या भाषणामध्येही अजित पवार यांनी पोतनीस, बडवे, दंडवते, घारे या सारख्या गुरुवर्यांचाही त्यांनी आदराने उल्लेख केला. जून १९६८ ते जून १९७४ या काळात अजित पवार बारामतीतील म. ए. सो. विद्यालयात इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंत शिकण्यासाठी होते. अकरावीला त्यांनी प्रवेश घेतला होता पण ते कोल्हापूरला शिक्षणासाठी गेल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब शिंदे यांनी यावेळी दिली.