अहमदनगर : जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. जिल्ह्यात सार्वजनिक शांतता आणि सार्वजनिक सुरक्षितता राखण्यासाठी हे आदेश जारी करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी त्यांना प्राप्त अधिकारानुसार संपूर्ण अहमदनगर जिल्हा महसूल स्थळ सीमेच्या हद्दीत महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या विविध कलमानुसार २० जानेवारी ते २ फेब्रुवारी २०२४ पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.
या आदेशानुसार नमूद केलेल्या कालावधीत आणि ठिकाणी कोणत्याही इसमास कोणत्याही प्रकारचे शख किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी कोणतीही वस्तू जवळ बाळगणे, सभा घेण्यास, मिरवणुका काढण्यास व पाच पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येण्यास मनाई केली आहे.
शासकीय सेवेतील व्यक्तींना ज्यांना आपल्या वरिष्ठांचे आदेशानुसार कर्तव्य पूर्तीसाठी हत्यार जवळ बाळगणे आवश्यक आहे. तसेच प्रेतयात्रा, धार्मिक कार्यक्रम, धार्मिक मिरवणूका, लग्न समारंभ, लग्नाच्या मिरवणूका हे कार्यक्रम, सभा घेण्यास अथवा मिरवणूका काढण्यास ज्यांनी रितसर परवानगी घेतली आहे अशा व्यक्तींना हा आदेश लागु राहणार नसल्याचे आदेशात नमूद केले आहे.
दरम्यान, मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांची पदयात्रा उद्या २१ जानेवारीला अहमदनगर जिल्ह्यामध्ये प्रवेश करणार आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या प्रतिबंधात्मक आदेशामुळे मोठी खळबळ उडाली आहे.