पुणे: कुख्यात गुंड शरद मोहोळ खून प्रकरणात पुणे पोलिसांनी अटक केलेल्या गुंड विठ्ठल शेलारची बुलेटप्रूफ स्कॉर्पिओ गाडी जप्त केली आली आहे. विठ्ठल शेलारने पांढऱ्या रंगाची ही स्कॉर्पिओ गाडी त्याच्या पुनावळे येथील फार्म हाऊसवर लपवून ठेवली होती. मात्र, गुन्हे शाखेच्या पोलिसांना या गाडी विषयी माहिती मिळाल्यानंतर त्यांनी ती ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली होती. तोपर्यंत विठ्ठल शेलारच्या साथीदारांनी ही गाडी इतरत्र हलवण्याचा प्लॅन केला होता.त्याप्रमाणे विठ्ठलचे साथीदार ही गाडी घेऊन निघालेही होते. परंतु, पोलीस आपल्या मार्गावर असल्याचे समजल्यानंतर त्यांनी गाडी रस्त्यात सोडून पळ काढला. त्यानंतर पुणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कार जप्त केली आहे. पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत सहा महागड्या कार जप्त केल्या आहेत.
शरद मोहोळ खून प्रकरणात पुणे पोलिसांनी आतापर्यंत 15 जणांना अटक केली आहे. अटकेत असलेल्या आरोपींच्या ताब्यातून पोलिसांनी आतापर्यंत क्रेटा, इंनोव्हा, फॉर्च्युनरसह सहा कार जप्त केल्या आहेत. आरोपींकडे असणाऱ्या गाड्यांविषयी माहिती घेत असतानाच पोलिसांना विठ्ठल शेलारच्या बुलेटप्रुफ कार विषयी माहिती मिळाली होती. मात्र, पोलीस ही गाडी जप्त करतील, या भीतीपोटी त्यांनी लपून ठेवण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या होत्या.
मात्र, पोलिसांना याची माहिती काही वेळातच मिळाली. पोलिसांनी तिचा पाठलाग सुरू केला. वाकडच्या भागात ही कार आली असतानाच या कार घेऊन जाणाऱ्यांना पोलीस मागावर असल्याचीही माहिती मिळाली. त्यांनी लागलीच ही कार रस्त्याच्या बाजूला सोडत पळ काढला. त्यानंतर पोलिसांनी सदर कार ताब्यात घेतली.
दरम्यान, कुख्यात गुंड शरद मोहोळ याचा पाच जानेवारी रोजी त्याच्या राहत्या घराजवळ खून करण्यात आला होता. मुन्ना पोळेकर आणि त्याच्या साथीदारांनी गोळ्या झाडून खून केला. शरद मोहोळचा खून होण्यापूर्वी एक महिना आधी विठ्ठल शेलार आणि गणेश मारणे यांच्यात मिटिंग झाल्याचे तपासात निष्पन्न झाले. गणेश मारणे टोळीचा सदस्य असलेला गुंड विठ्ठल शेलार हा मुळचा मुळशी तालुक्यातील उरवडे गावचा रहिवासी आहे. त्याच्यावर खून, खूनाचा प्रयत्न, अपहरण आणि खंडणीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. २०१४ मध्ये त्याच्यावर मोक्काअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच त्याला अटकही झाली होती. २०१७ मध्ये त्याची जामीनावर सुटका करण्यात आली होती.