पिंपरी (पुणे) : पुणे महापालिकेने वृक्षांची छाटणी किंवा तोडणी करणाऱ्यांवर धडक कारवाई सुरु केली आहे. जाहिरातीचा लोखंडी सांगाडा आणि त्यावरील फलक दिसत नसल्याने वृक्षांची छाटणी करणाऱ्या शहरातील सात फलकधारकांवर गुन्हे दाखल करून त्यांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत.
शहरातील पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात येते. मात्र, शहरात सातत्याने बेकायदेशीर वृक्षतोड केली जात आहे. जाहिरात फलक दिसत नसल्याने झाडांवर कुऱ्हाड चालविली जाते.
फलक दिसण्यासाठी अनधिकृत वृक्षतोड केल्याप्रकरणी आतापर्यंत सात जाहिरात संस्थांवर गुन्हे दाखल करून त्यांचे परवानेही रद्द करण्यात आले आहेत. तसेच, अनधिकृत वृक्षतोड केल्याप्रकरणी नऊ कार्यक्षेत्रांतील पोलीस ठाण्यांत गुन्हा दाखल करण्याबाबत पत्रव्यवहार करण्यात आला आहे. काही प्रकरणांची तपासणी देखील सुरू आहे.
याबाबत अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांनी सांगितले, की जाहिरातफलकधारकांनी आपल्या फलकांसमोरील वृक्षांची छाटणी किंवा तोडणी अनधिकृतरीत्या करू नये. महापालिकेच्या परवानगीशिवाय वृक्षतोड केल्यास महाराष्ट्र शासन जाहिरात नियमन व नियंत्रण नियमानुसार जाहिरातफलकधारकाचा परवाना रद्द करण्यात येईल. जाहिरातदाराविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. चिखली परिसरामध्ये अनधिकृतरीत्या वृक्षतोडणी करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.