राहुलकुमार अवचट
यवत : आकाशात झेपावणाऱ्या विमानाचा आवाज कानी पडताच मुलांच्या नजरा आजही आपसूकच आकाशाकडे वळतात. आता यामध्ये नव्याने विकसीत झालेल्या ड्रोन तंत्रज्ञानाची भर पडली आहे. लहानथोर सगळ्यांनाच या ड्रोनने भुरळ घातली आहे. उंचावरून ड्रोनने टीपलेली छायाचित्रे पाहताना मुले हरखून जातात. मुलांमधील याच जिज्ञासेला खतपाणी घालण्याच्या उद्देश्याने पुण्यातील इग्नाईट माईंडस् (ignite minds) या संस्थेचे अतुल राऊत व सुवर्णा खराडे यांच्या विशेष सहकार्याने व मिरवडी ग्रामपंचायतीच्या सहकार्याने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मिरवडी, शेलार-मेमाणवाडी व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर माध्यमिक विद्यालय, मिरवडी येथील विद्यार्थी, शिक्षक व पालकांना ड्रोन बनविण्याचे व उडविण्याचे प्रत्यक्षिक दाखविण्यात आले. विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेचा मनमुराद आनंद लुटला.
या कार्यशाळेत मुलांना रेसिंग कारबद्दल देखील माहिती देण्यात आली. या वेळी GDIOT या पुण्यातील संस्थेचे विक्रांत पाटील व त्यांच्या टीमने विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन करून प्रात्यक्षिकही दाखवले. मुलांनी मोठी स्वप्ने पाहावीत व ती प्रत्यक्षात यावीत तसेच ज्ञानवृद्धी व्हावी या उद्देशाने असे अनेक कार्यक्रम मिरवडी येथे राबविण्यात येतात.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मिरवडी ग्रामपंचायत येथे ड्रोन उडविण्याचे प्रात्यक्षिक व रेसिंग कारचा थरार मुलांना प्रत्यक्ष अनुभवण्यास मिळाला. शालेय वयोगटातील अभ्यासक्रम शिकता शिकता एक वेगळा व नाविन्यपूर्ण उपक्रम अनुभवयला मिळावा व त्यातून मुलांची वैचारिक शक्ती वृद्धिंगत व्हावी व भविष्यात आपली शाळकरी मुले विविध क्षेत्रात देदीप्यमान यश मिळवण्यासाठी सज्ज व्हावीत, या उद्देशाने अतुल राऊत यांच्या सहकार्याने अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू आहेत. याचाच एक भाग असलेला ड्रोन प्रशिक्षण हा कार्यक्रम मिरवडी येथे उत्साहात पार पडला.
या वेळी उपस्थित मान्यवरांना सरपंच शांताराम थोरात, उपसरपंच कल्याणी कोंडे, मार्केट कमिटी संचालक बाळासाहेब शिंदे, शाळा अध्यक्ष निलेश फणसे, सोमनाथ ढवळे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. सूत्रसंचालन माजी सरपंच सागर शेलार यांनी केले. या वेळी विद्यार्थी, शिक्षक, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.