मुंबई : कोराना काळानंतर राज्याच्या ग्रामीण भागातील शैक्षणिक स्थिती खालवल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.विद्यार्थ्यांना सोपी गणितं, मराठी, इंग्रजी वाचनात अडचणी निर्माण होत असल्याचा अहवाल असरने प्रकाशित केला आहे. कोरोना काळात विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे ऑनलाइन माध्यमातून दिले जात होते. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांची लिखाणेची सवय तुटली. त्यातच आता इतर विषयांबाबतही शालेय शिक्षणाची गुणवत्ता खालावल्याचे चित्र आहे.
काय सांगतो अहवाल?
असरकडून देशातील २८ जिल्ह्यांमध्ये यासंदर्भातील सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये राज्यातील नांदेड जिल्ह्याचा समावेश होता. २०१८-१९ नंतर २०२२-२३ या वर्षाचा असर अहवालात किमान क्षमता विकसित झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाण ७ ते १० टक्क्यांनी घटले आहे. इतकेच नव्हे तर शाळेतील पायाभूत सुविधांची उपलब्धता देखील कमी झाल्याचं या अहवालातून समोर आलं आहे. दहा ते बारा साध्या सोप्या वाक्यांचा परिच्छेद दुसरीच्या विद्यार्थ्यांना येणं अपेक्षित आहे. मात्र, पाचवीतील साधारण ४४ टक्के आणि आठवीतील २४ टक्के विद्यार्थी तो परिच्छेद वाचू शकले नाहीत.
गणित जमेना
पाचवीच्या विद्यार्थ्यांना दोन अंकी संख्येची वजाबाकी करण्यास सांगण्यात आले. मात्र ते गणित अवघ्या १९.६ टक्के विद्यार्थ्यांना सोडवता आले. आठवीच्या विद्यार्थ्यांना तीन अंकी संख्येस, एक अंकी संख्येने भागण्यास सांगितले. मात्र, अशा स्वरूपाचे गणित सोडवू शकणाऱ्या इयत्ता आठवतील विद्यार्थ्यांचे प्रमाण ४०.७० टक्के वरुन ३४.७ टक्क्यांपर्यंत घसरले आहे.
इंग्रजी वाचनाचाही बोऱ्या
What is the time? / This is a large house. / I like to read, अशी वाक्य पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना वाचता आली नाहीत. तर पाचवीतील २५.५ टक्के विद्यार्थी, आठवीतील ४९.२ टक्के विद्यार्थी आणि पाचवीतील १० टक्के विद्यार्थ्यांना इंग्रजी कॅपिटल अक्षरेही ओळखता आली नाहीत.
अहवालात नापासांचा टक्का किती?
इयत्ता पाचवीमध्ये वजाबाकीमध्ये ६८ टक्के, मराठी वाचन ४४ टक्के, इंग्रजी वाचन ७६ टक्के असा नापासांचा टक्का आहे. त्याचप्रमाणे इयत्ता आठवीत भागाकारामध्ये ८० टक्के, मराठी वाचन २४ टक्के, इंग्रजी वाचन ५१ टक्के असा नापासांचा टक्का आहे.